Breaking News

कोरोनाला न घाबरता मंत्र्यांनी लावली हजेरी मंत्रिपरिषदेला मंत्रालय, जिल्ह्यातून मंत्र्याची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात दिवसेंदिवस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढतच असताना या आजाराच आगामी काळात पराभूत करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी व्हिडीओ काँन्फरसिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे यातील अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यातून बैठकीला हजेरी लावली.

मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील,  एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे मंत्री उपस्थित होते. तर  मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई,  दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲङ अनिल परब उपस्थित होते.  तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्याहून या बैठकीत सहभागी झाले

या बैठकीत प्रारंभी कोरोना साथीला रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, अन्न धान्य पुरवठा, लॉकडाऊन, कम्युनिटी किचन यावर मंत्र्यांनी चर्चा करून सुचना केल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलद चाचणीची गरज जिथे जिथे आहे तिथे प्राधान्याने करण्यात येईल असे सांगितले.  होमगार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. भाजीपाला व इतर आवश्यक दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.  इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरीत अशा ५.५० लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ६२.७१ टक्के मतदान

मागील काही दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामुळेही राजकिय वातावरण चांगलेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *