Breaking News

विधानसभेलाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची महाआघाडी संयुक्त बैठकीत एकत्रितपणे लढवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा

मुंबई: प्रतिनिधी
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले की, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठकी होतील. विखे पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपात जातील असे वाटत नाही. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते आ. अजित पवार, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनिल तटकरे, सपाचे नेते आ. अबू आझमी, युवा स्वाभिमान पक्षाचे आ. रवी राणा, आमदार हसन मुश्रीफ, आ. बाबाजानी दुर्राणी, शेकापचे नेते आ. जयंत पाटील, शेकापचे नेते आ. गणपतराव देशमुख, सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. नसीम खान, बविआचे आ. हितेंद्र ठाकूर, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे आ. शरद रणपिसे, आ. जोगेंद्र कवाडे, गवई गटाचे राजेंद्र गवई, आ. हेमंत टकले,आ. अनिकेत तटकरे आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *