Breaking News

परमबीर सिंग व सचिन वाझे भेटीमागे कोण? चौकशी करण्याची काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग व सचिन वाझे हे चांदिवाल आयोगासमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
परमबीरसिंह व सचिन वाझे हे दोघेही अनेक प्रकरणात आरोपी आहेत. आणि अशा पद्धीतीने दोन आरोपीमध्ये चर्चा होणे गंभीर आहे, यामुळे चौकशीमध्ये बाधा पोहचू शकते. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नाही. जर असं झालं असेल तर याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? त्यांच्या भेटीमागे कोण आहे ? त्यात काय कट शिजला? हे जनतेच्यासमोर आलं पाहिजे असेही ते म्हणाले.

अॅटालिया इमारतीसमोर स्फोटक ठेवल्याप्रकरणी सदर गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या झाल्याने या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे आणि त्यावेळचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे दोघेही संशयाच्या भोवऱ्यात आले. तसेच याप्रकरणी वाझे यांनी प्रत्येक गोष्टींची माहिती परमबीर सिंग यांना दिल्याची चर्चाही त्यावेळी सुरु झाली होती. त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रूपये बार चालकांकडून वसूल करण्यास सुरुवातीला सचिन वाझे यांना सांगण्यात आल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी करत त्याची रितसर लेखी तक्रार एका पत्रान्वये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना पाठवित केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खऴबळ उडाली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी आणि अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रूपयांच्या आरोप प्रकरणात हे दोघेच संशयाच्या भोवऱ्यात असताना आता या दोघांची भेट झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *