Breaking News

सरकारच्या पाठिंब्यामुळेच कट्टरतावाद्यांकडून अल्पसंख्यांकावर हल्ले

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

कोल्हापूरातील चंदगड येथे रविवारी प्रार्थनेसाठी गेलेल्या ख्रिश्चन धर्मियांवर कट्टरवाद्यांकडून दगडफेक करून तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक भाविक गंभीर जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही. सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या पाठिंब्यामुळेच अल्पसंख्याक समाजावर कट्टरतावाद्यांकडून हल्ले सुरु आहेत अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.   

या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून ते म्हणाले की, २३ डिसेंबर रोजी  कोल्हापूरच्या चंदगडमधील न्यू लाइफ फेलोशिप या चर्चमध्ये ४० ख्रिश्चन धर्मिय प्रार्थनेसाठी जमले होते. यावेळी दुचाक्यांवर आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी प्रार्थना करणा-या भाविकांवर बिअरच्या बाटल्या आणि दगडफेक करीत तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात १० ते १२ लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांछनासप्द आहे.

देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून दलित, अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून देशात धर्मांधतेचे विष पेरले जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रातही भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून राजकीय फायद्यासाठी जाती-जातीत तेढ पसरवण्याचे उद्योग सुरु आहेत. भीमा कोरेगावची घटना याचेच उदाहरण आहे. गेल्या साडेचार वर्षात काहीही काम केले नाही. त्यामुळे मते मिळवण्यासाठी ध्रुवीकरण करण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 कोल्हापूरची घटना याचेच उदाहरण आहे. मोदी सरकारचा सबका साथ सबका विकासचा बनावटी मुखवटा गळून पडला असून खरा धर्मांध चेहरा समोर आला आहे. सरकारने हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *