Breaking News

नागपूरात काँग्रेसला तर अकोल्यात शिवसेनेला धक्का सहापैकी चार ठिकाणी भाजपा तर फक्त दोन ठिकाणी मविआचे उमेदवार विजयी

मराठी ई-बातम्या टीम

विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पाठविण्यात येणाऱ्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत सहापैकी चार जागांवर भाजपाने यश मिळवित महाविकास आघाडीवर कुरघोडी केली आहे. तर फक्त दोन ठिकाणी महाविकास आघाडीला विजय मिळविता आला आहे. विशेष म्हणजे नागपूरात महाविकास आघाडीचे मते फुटून ती भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाल्याने त्यांच्या मताधिक्यात ६० मतांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

नागपूरात डॉ रविंद्र भोयर यांना काँग्रेसने सुरुवातीला उमेदवारी दिली होती. परंतु मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच अचानक डॉ.भोयर यांची उमेदवारी काढून घेत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचा पराभव होणार असल्याचे निश्चित मानले जावू लागले आणि त्यानुसार काँग्रेसचा पराभवही झाला. मात्र भाजपाचे उमेदवारी चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाची ३१८ मते मिळाली. त्यात आणखी ६० मते अधिकची मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांची ही मते बावनकुळे यांना मिळाल्याने आघाडीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले.

अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थेमधून मागील तीन वेळा निवडूण गेलेले शिवसेनेचे गोपीकिशन बजौरीया यांना यावेळी मात्र आपली जागा राखता आली नाही. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांना ४३८ मते मिळवित विजयी झाले. बजौरीया यांना ३२८ मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यातील ही जागा भाजपाने हिसकावून घेण्यात यश मिळाले आहे.

तर कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून राज्यमंत्री सतेज बंटी पाटील हे उभे होते. मात्र तेथे प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या दोन जागांवरही भाजपाचे उमेदवार राजहंस सिंग, शिवसेनेचे सुनिल शिंदे हे बिनविरोध निवडूण आले. या दोन्ही जागांवर भाजपा-शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले नाही. त्यामुळे या दोन्ही जागा बिनविरोध निवडूण आल्या. याशिवाय धुळे-नंदूरबार या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर पाठविण्याच्या जागेसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाचे अमरीश पटेल हे बिनविरोध विजयी झाले.

तर काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर स्व.खा.राजीव सातव यांच्या पत्नी डॉ प्रज्ञा सातव या बिनविरोध निवडूण आल्या.  वास्तविक या ६ जागांपैकी फक्त २ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. तसेच या निवडणूक भाजपा विरूध्द काँग्रेस, शिवसेना अशी लढत होती.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *