Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम

राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्यांकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी पदभार दुसऱ्याकडे सोपविण्याची वेळ आली आहे का, असे एका पत्रकाराने विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्यावतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा.

महाराष्ट्रातील परिस्थिती देशात चांगली आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्याचे एका पत्रकाराने निदर्शनाला आणले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते गेले ७० दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत. एसटीचा संप चालू असून ७० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारी भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. निराशेमुळे तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. त्यांना विमा मिळत नाही आणि नुकसानभरपाईही मिळत नाही. असे असूनही महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे असे संजय राऊत यांना वाटत असेल तर ठीक आहे.

नशिबाने काल परवा प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या संजय राऊतांसारख्या नेत्याने आपल्या दृष्टीची चिंता करू नये. ती तपासायला भाजपाचे नेतृत्व समर्थ आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चेअरमनपद मिळवले पण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कसा पडला हे त्या पक्षाला समजत नाही. तुम्हाला पूर्णपणे संपविण्याचा डाव चालू असून त्यात तुम्ही फसत चालला आहात. त्याची आधी चिंता करा, असा टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *