Breaking News

अजित पवार म्हणाले, मी युक्तीवाद करणार नाही विरोधी पक्षनेते पद भाजपाने नव्हे तर राष्ट्रवादीने दिले

हिवाळी अधिवेशन काळात संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून अधिवेशन संपताच भाजपाने अजित पवार यांना लक्ष्य करत त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. त्याचबरोबर भाजपाकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीही केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मंगळवारी वाद संपविण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर आज बुधवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षनेते पद मला काही भाजपाने दिलेले नाही. ते पद मला राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहे. त्यामुळे पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे स्पष्ट करत मी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केलेले नसल्याचे ठामपणे सांगितले.

विधानभवनातील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

आजपर्यंत कोणत्याही महापुरुषाबद्दल मी वादग्रस्त विधान केलेले नाही. मात्र राज्यपालांसह भाजपाचे पदाधिकारी सातत्याने महापुरुषांचा अवमान करत आहेत. मात्र त्याबद्दल ही मंडळी चकार शब्द काढत नाही. महाराष्ट्रातील जनता हे सर्व बघत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्य कर्तृत्वाचा आदर करुन स्वराज्यरक्षक ही भूमिका मी मांडली. माझे इतिहासाचे वाचन आणि आकलन याच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडली. त्यामुळे त्यासंदर्भात जे तपशीलवार आरोप – प्रत्यारोप होताहेत त्याबाबत युक्तिवाद करणार नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

मी इतिहासाचा संशोधक नाही. तो विषय इतिहास संशोधकांचा, अभ्यासकांचा आहे. नव्या पिढीतील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याबाबत तपशीलवार विवेचन केले आहे. इतरही अनेकांनी भूमिका मांडल्या आहेत. यापुढेही इतिहास संशोधकांनी त्यावर चर्चा करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करत राहावे. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्तच ठरेल. मात्र राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित होऊन भाजपाने राज्यभर आंदोलन करण्याचे षडयंत्र रचले. राजकीय हेतूने वातावरण तापवणे आणि विद्वेषाचे राजकारण करणे हे जनता कधीही सहन करणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *