Breaking News

महेबूबा मुफ्तींबरोबर सत्ता भोगणा-या भाजपने इतरांना देशभक्ती शिकवू नये सत्ता गेली पण भाजपची खोटारडेपणाची सवय गेली नाही!: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी

सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले पण भाजप नेत्यांची खोटे बोलण्याची सवय काही गेली नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे, असे खोटे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी नाही. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. मात्र फडणवीस यांना काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे असा साक्षात्कार झाला व त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसवर आरोप करण्याचा नादात आपण खोटे बोलत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याच्या अगोदर त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेस पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले. देशप्रेम हे काँग्रेसच्या नसानसात आहे. स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये. महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले, याचा ५२ वर्ष आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करत आहेत. परंतु २०१७ साली याच महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते, त्यावेळेला भाजप त्यांच्याबरोबर सत्तेत होता. काँग्रेसने यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितला होता, तेव्हा मात्र भाजप सत्तेला चिकटून बसली होती. हेच त्यांचे स्ट्रॅटेजीक अलायन्स होते का? महेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात रहावी आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर यावा यासाठी काँग्रेस पक्ष तेथील निवडणुकांमध्ये सहभागी झाला आहे. त्याचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *