पुणे येथे हनुमान मंदीरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल महाआरती केल्यानंतर आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबादेतील जाहिर सभेसह जून महिन्यात अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांना अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र हा अयोध्या दौरा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या आधीच हा दौरा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यापार्श्वभूमी भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, अयोध्येचा दौरा हा कोणीही करायला हरकत नाही, कारण प्रभू श्रीराम हे आपलं दैवत आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी जर कोणी जाणार असेल, तर त्याचं स्वागतच आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी जात असतो आणि मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला तिथे जावसं वाटणं यामध्ये काही गैर नाही. कारण, प्रभू श्रीरामांचं इतकं मोठं मंदिर हे त्या ठिकाणी होतंय, त्याची भव्यता पाहण्याची इच्छा आणि प्रभू श्रीरामाची दर्शन घेण्याची इच्छा ही स्वाभाविक असल्याच मत यावेळी व्यक्त केले.
याचबरोबर, महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा व मनसेवर केला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत हे निराश व्यक्ती आहेत. ते दिवसभरात काहीही बोलत असतात, कितीवेळा आम्ही उत्तरं द्यायची. आम्हाला कामधंदे आहेत, त्यांना नाहीत असा टोलाही राऊत यांना लगावला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करत महाविकास आघाडीने विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मताधिक्याने पराभव केला. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूरला पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत जाधव यांना ९७,३३२ तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. त्यावर बोलताना म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत, अतिशय मोठ्याप्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही वारंवार जे सांगत होतो की ही जी पोकळी आहे ती आम्ही भरून काढत आहोत. ती काल केल्याचं दिसलेलं आहे, कारण एकटे लढलो तरी जेव्हा भाजपा आणि शिवसेना एकत्र लढलो होतो त्यापेक्षा जास्त मतं आहेत. ते तिघं लढले तरी त्यांची मतं वाढलेली नाही. आताचे मत हे सहानुभूतीचं मत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये आता ही जागा आम्ही १०० टक्के जिंकणार या बद्दल माझ्या मनात खात्री असल्याचेही ते म्हणाले.
