Breaking News

पदुम विभाग म्हणतो व्हॅलेनटाईन डे ला गाईला मिठी.., अजित पवार म्हणाले, मी मिठ्या मारा म्हणालो का? सदसदविवेक बुध्दीला स्मरून योग्य निर्णय घ्या

जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. मात्र या दिवसाला भारतातील एका वर्गाकडून विरोध केला जातो. या वर्षाचा व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असतानाच केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा असे आवाहन केले आहे. त्यासाठी खास पत्रदेखील या विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर मिश्किल टीप्पणी करत म्हणाले, आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरुण प्रत्येकाने योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच कोणाला मिठ्या मारा असे मी म्हणालो आहे का? असे सूचक वक्तव्य केले. ते आज ९ फेब्रुवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाने आपल्या पद्धताने विचार करावा. स्वत:च्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटेल ते करा. केंद्र सरकारने तसे आवाहन केले आहे. तसे त्यांचे मत आहे. आम्ही तसे मत प्रदर्शित केलेले नाही. तसेच कोणाला मिठ्या मारा असे मी म्हणालो आहे का? असा मिश्किल सवालही केला.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. के. दत्ता यांनी एक पत्र काढून १४ फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात दत्ता यांनी म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळे गायीला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखले जाते. काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईला आलिंगन दिन म्हणून साजरा करावा आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करावे, असेही या पत्रात म्हणण्यात आले आहे. गायीला मिठी मारण्याचा दिवस साजरा करा, असे निर्देश केंद्र सरकारकडून येताच त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *