Breaking News

मोदी धृतराष्ट्र झाले का? गांधी जयंती दिवशी युपीमध्ये लोकशाहीचे किळसवाणे वस्त्रहरण! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पहात आहे. महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या झाली आणि ते दाबण्यासाठी अजयकुमार बिश्त यांचे उत्तर प्रदेश सरकार बेफाम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र झाले का? असा जळजळीत सवाल विचारुन सत्तेने बेधुंद झालेल्या व अहंकारीवृत्तीच्या आदित्यनाथ सरकारचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जाहीर निषेध करत आहे, अशी प्रतिक्रीया सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये ज्या पीडित परिवाराला दिलासा दिला पाहिजे त्याऐवजी जिल्हाधिकारी जाऊन त्यांना धमक्या देत आहेत, त्यांचे फोन काढून घेतले जात आहेत, त्यांना मारहाण केली जात आहे. हा किळसवाणा प्रकार संपूर्ण देशाने पाहिला आहे. दुसरीकडे पीडित परिवाराला राजकारणीच नव्हे तर माध्यमांनाही भेटू दिले जात नाही. माध्यमांची जाहीर गळचेपी सुरू आहे. त्या छोट्या गावाला एका मोठ्या पोलीस छावणीचे स्वरुप आलेले दिसत आहे. महिला पत्रकारांनाही अत्यंत ह्रद्य शून्यतेची वागणूक दिली जात आहे, हे सर्व महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या खासदारानांही धक्काबुक्की करण्यात आली. त्यांनाही पीडित परिवाराला भेटू दिले नाही, हेही देशाने पाहिले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक पीडितेवर बलात्कारच झाला नाही, असा संतापजनक कांगावा करत आहेत. तिथले अतिरिक्त जिल्हाधिकारी महिला पत्रकारांशी अत्यंत बेजबाबदार व हिन पातळीवर संवाद करत आहेत. रात्रीच्या अंधारात परिवाराच्या सहमतीशिवाय त्यांना अंतिम दर्शन घेऊ न देता जबरदस्तीने पोलीसांनी पीडीत मुलीवर अंतिम संस्कार केले, हे सर्व भयानक आहे. तेथील जिल्हाधिकारी यांचा पिडीत परिवाराला धमकी देणारा व्हायरल झालेला व्हिडीओ हे उत्तर प्रदेशमध्ये थंड रक्ताच्या अमानवी लोकांचे राज्य आहे हे स्पष्ट करणारे आहे. यातूनच उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज आहे हे स्पष्ट होत असून हे अत्याचारी सरकार तात्काळ बरखास्त झाले पाहिजे, ही मागणी जन मानसातून उठत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याबाबतचे मौन कानठळ्या बसवणारे असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *