Breaking News

एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

क्रुज ड्रग्स प्रकरणात एनसीबी आणि समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा कार्यक्रम नवाब मलिक आणि संबंधितांनी बनवला आहे. त्या अनुषंगाने रोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप करत असताना आता केंद्र सरकारवर किंवा तपास यंत्रणाना दोषी ठरवण्यासाठी खोटे, चुकीचे ठरविता येईल यासाठी असा ओढूनताणून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातूनच आता ही व्हिडीओ क्लिप आली असावी, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्या विरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओ क्लिपसंदर्भात विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे दिली. एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर ट्वीट करुन त्या आधारे अनुमान लावणे, हे एका जबाबदार खासदाराने वागणे चुकीचे वाटते. व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून जर ते खरे असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य होईल. कोणी तरी व्हिडिओ क्लिपमध्ये बोलतोय ‘सत्यमेव जयते’ बोलत असेल व त्या आधारे अनुमान लावणे हे चुकीचे आहे. आपण बोलतोय ते खरे आहे, हे दाखवण्यासाठी त्या गोष्टी क्रिएट केल्या जात नाहीत ना? अशा प्रकारचा दाट संशय त्यांनी यावेळी व्यक्त केले.

त्या कंपनीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी

या आधीही आरोग्य विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेत गोंधळ झाला. त्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्या. त्यातून सरकारने शहाणपण शिकायला पाहिजे होते. परंतु तरीही त्याच ब्लॅक लिस्टेड कंपनीला पुन्हा परीक्षांचे काम दिले गेले. ज्या चुका मागील खेपेस झाल्या होत्या त्या दुरुस्त केल्या नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार, मंत्री बच्चू कडू या सर्वांनीच एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी केली. परंतु त्याला केराची टोपली दाखवली गेली. परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपनीचे आणि अन्य कोणाचे काही साटेलोटे आहे का, यामध्ये काही व्यवहार झाले आहे का, याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

आज सकाळी दहा वाजताचा पेपर बारा वाजता सुरु झाला. नाशिकला परीक्षेची वेळ झाली तरी पेपर आला नव्हता. अक्षय कॅम्पसला आज वेळेवर पेपर पोहोचले नव्हते. तीन-चार हजार रुपये खर्च करुन सिंधुदुर्गमधून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते, त्यांनीही या गोंधळाचा फटका बसला. नाशिकमध्येही परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. काही ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची हॉल तिकीट आली नव्हती. अशा प्रकारे विद्यार्थी आणि त्यांच्या भविष्यावर सरकारने पाणी फिरवण्याचे काम केले आहे. म्हणून या सर्व प्रकरणाची एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

राऊत यांना भाजपविषयी कावीळ झालीय  

१०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा भारताने पूर्ण केल्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी यावर संशय व्यक्त केला. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, ज्याची जशी दृष्टी तशी त्याला सृष्टी दिसणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार तसेच भाजपा यांच्या विषयी त्यांना कावीळ झालेली असल्यामुळे त्यांना सगळेच पिवळे दिसते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेले १० कोटींचे लसीकरण सिद्ध करावे, नंतर १०० कोटीच्या लसीकरणावर भाष्य करावे, असे आव्हानही दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त लसी उपलब्ध करुन दिल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. मुंबईने जास्तीत जास्त लसीकरण केल्याबद्दल आपण मुंबई महापालिकेचा गौरव करतो आणि लसीकरणासाठी मिरवून घेतले. मग ते लसीकरण बोगस आहे का? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *