Breaking News

ईडीने मर्जीने आरोपी निवडले का? ; न्यायालयाने ईडीला झापलं

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे विशेष न्यायालयाने ईडीवर ओढत पत्रावाला चाळ प्रकरणात मुख्य आरोपींना अटक करण्याचे सोडून मर्जीने आरोपी निवडले आहेत का? असा सवाल न्यायालयाने ईडीला केला.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए विशेष न्यायालयाने आज संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामिनासाठी १२२ पानी आदेश काढले. या आदेशात न्यायालयाने आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन देताना ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, दोन्ही आरोपींना बेकायदेशीरपणे अटक केली आहे असे कोर्टाला वाटत आहे. मुख्य आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि या घोटाळ्यातील सरकारी अधिकारी यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

पीएमएलए न्यायालयाने आपल्या १२२ पानी आदेशात ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने अतिशय महत्त्वाची निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने म्हटले की, दिवाणी खटले हे मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून आणि अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली असल्याची महत्त्वाची टिप्पणी न्यायालयाने केली.

या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक करण्या ऐवजी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली. यात ईडीने आरोपी स्वत:च निवडले असल्याचे दिसत असल्याचे न्यायालयाने म्हणत ईडीच्या तपासावर कडक शब्दात ताशेरे ओढले.

न्यायालयाने ईडी आणि म्हाडाचं म्हणणं मान्य केलं तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखं होईल. त्याच्या परिणामी सामान्य लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल असेही न्यायालयाने सांगितले.

पीएमएलए विशेष न्यायालयाने ईडीवर कडक शब्दात ताशेरे ओढल्याने पत्राचाळ घोटाळ्यातील तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संजय राऊत यांनी देखील या प्रकरणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता.

पत्राचाळ प्रकरण काय?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा ईडीचा आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंटमॅन’ म्हणून वावरत होते. प्रवीण राऊत यांच्या मार्फत संजय राऊत व्यवहार करत होते. घोटाळ्यातील पैशांचा वापर संजय राऊत यांनी विविध मालमत्ता खरेदी केला असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *