Breaking News

७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; कार्यक्रम जाहीर सरपंच पदासाठीही निवडणूक होणार

अंधेरी पुर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक पार पडताच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी उडणार आहे.

शिवसेना फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटात वाद उफाळून आल्यामुळे याचा परिणाम राज्यातील सरकारसह पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींबरोबरच ग्राम पंचायतींमध्येही गटातटाचे राजकारण राज्यात पहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदे की ठाकरे गटाचे वर्चस्व हे पहायला मिळणार आहेत. यावर या निवडणुका रंगणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार आहेत. 

२८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७७५१ ग्राम पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. 

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा य़ाचा निकाल अद्याप लागला नसल्याने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि  शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना या नावाने निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.धनुष्यबाण कोणाचा याचा निर्णय अद्याप झालेला नाही मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुका चिन्हांवर आणि पक्षाच्या वतीने लढविल्या जात नाहीत तरी देखील ठाकरे शिंदे गट राज्यात कोणाचे वर्चस्व यावर रान पेटणार हे निश्चित.

१८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी  सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :

अहमदनगर- २०३, अकोला- २६६, अमरावती- २५७, औरंगाबाद- २१९, बीड- ७०४, भंडारा- ३६३, बुलडाणा- २७९, चंद्रपूर- ५९, धुळे- १२८, गडचिरोली- २७, गोंदिया- ३४८, हिंगोली- ६२, जळगाव- १४०, जालना- २६६, कोल्हापूर- ४७५, लातूर- ३५१, नागपूर- २३७, नंदुरबार- १२३, उस्मानाबाद- १६६, पालघर- ६३, परभणी- १२८, पुणे- २२१, रायगड- २४०, रत्नागिरी- २२२, सांगली- ४५२, सातारा- ३१९, सिंधुदूर्ग- ३२५, सोलापूर- १८९, ठाणे- ४२, वर्धा- ११३, वाशीम- २८७, यवतमाळ- १००, नांदेड- १८१ व नाशिक-१९६. एकूण-७,७५१.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *