Breaking News

संजय राऊत यांचे मोदी आणि आयोगावर सोडले टीकास्त्र

महाराष्ट्रातील राजकारणाचा खेळखंडोबा झाल्यानंतर आणि विद्यमान केंद्रातील भाजपाला २०२४ च्या निवडणूकीत काहीही करून ४०० पार लोकसभा निवडणूकीचा टप्पा पार करायचा असल्याची घोषणा दिली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या माध्यमातून कथित इलेक्टोरल बॉण्डमधून कोणत्या राजकिय पक्षाला किती निधी मिळाला याची गुप्त माहितीही बाहेर आली. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशातील लोकसभा निवडणूकांची घोषणा केली. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपासह केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले.

संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज निवडणूका जाहिर केल्या आहेत. या निवडणूकीच्या माध्यमातून देशात सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. तो या निवडणूकीच्या माध्यमातून घडवून आणू असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्रातील सत्ते विराजमान असलेल्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याची चर्चा जनतेत आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपध्दतीबद्दल जनतेच्या मनातही शंका आहे. त्यामुळे या निवडणूकीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील शंकेचे निरसन करावे. निष्पक्षपणे, स्वतंत्रपणे या निवडणूकांच नियोजन व्हावे, कायदा सुव्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ आणि पैशाची उधळपट्टी यावर नियंत्रण असणे गरजे असल्याचे मतही यावेळी यावेळी व्यक्त केले.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त पदी टी.एन शेषण होते तेव्हा देशातील जनतेत एकप्रकारचा विश्वास होता. कोणत्याही प्रकारचा घोटाळा, चोऱ्या माऱ्या, होणार नाही. परंतु आज जनता साशंक आहे. जरी आज निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूकीच्या तारखा जाहिर केलेल्या असल्या तरी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका पार पडतील का आणि लोकशाही व्यवस्था टीकून राहिल की नाही हे आगामी निवडणूकीत ठरेल असे सूचक वक्तव्यही यावेळी केले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूकीच्या कार्यपध्दतीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या प्रत्येक भाषणात आणि सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी देतात. तशी गॅरंटी निवडणूक पारदर्शी असेल असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार का देत नाहीत? असा सवाल करत मला वाटतं की मोदी आणि निवडणूक आयोग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे त्यांचे निर्णय आणि भूमिकांवरून स्पष्ट दिसून येत आहे. तसेच ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात असलेली साशंकता आणि पारदर्शक निवडणूकीबाबत मोदी गॅरंटी का देत नाहीत असा सवालही यावेळी उपस्थित केला.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *