Breaking News

आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?

राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते आदित्य ठाकरे यांनी थेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांना २४ तासात पालिकेतील कार्यालय रिकामे करा अन्यथा मुंबईकर आपला राग दाखवतील असा गर्भित इशारा देत महापालिकेशी संबध काय असा सवालही केला.

पालकमंत्र्यांना महापालिकेत कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? त्यांनी तात्काळ आपलं कार्यालय खाली करावं. येत्या २४ तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं केलं नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. आदित्य ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी बोलत बोलत होते. त्यावेळी त्यांनी इशारा दिला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही मंत्री असताना महापालिकेत बैठका घेतल्या. पण कुठेही असं दालन हडपलं नाही. हे थांबलं पाहिजे. बदलंल पाहिजे. नाही तर मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौरांना दालन दिलं पाहिजे. आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून महापालिकेत केबिन दिली पाहिजे. या दालनात पालकमंत्री नाहीत तर भाजपाचे माजी नगरसेवक बसले होते. नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे २४ तासात थांबलं नाही. केबिन खाली केली नाही तर कधी ना कधी तरी मुंबईकर राग व्यक्त करतील. त्याला जबाबदार कोण असेल माहीत नाही, असे सूचक वक्तव्यही केले.

त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांचा मोर्चा तुम्ही पाहिला असेल. १ जुलै रोजी मुंबईकरांनी आपला राग व्यक्त केला. आता असं जर बिल्डर कंत्राटदारांचं सरकार पालिकेत बसणार असेल तर तिथे टॉवर येतील. पुढचे पालक मंत्री टॉवर बांधतील, अशी खोचक टीका करत आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आता कुठेही तुम्ही महाराष्ट्रात जा. ज्या घोषणा वर्षभरात झाल्या. त्या फक्त होर्डिंगसाठी झाल्या आहेत. प्रत्यक्षात कामं नाहीये. कृषी आणि उद्योग क्षेत्र कोलमडलं आहे, असा आरोपही केला.

मणिपूर प्रश्नी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मणिपूरबाबत आम्हाला बोलू दिलं नाही. ज्या महिलांची धिंड काढली त्यातील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या जवानाची पत्नी आहे. तिच्यावर असा अत्याचार होत असेल तर कुठे गेली तुमची देशभक्ती? कुठे गेलं तुमचं देशप्रेम? असा सवाल करत तुम्ही महिला असणं गरजेचं नाहीये. तुम्ही कुणाचा भाऊ, बहीण आणि आई असणं गरजेचं नाही. या देशातील नागरिक म्हणून जर असं कुणाबाबत घडलं तर तुम्हाला राग आलाच पाहिजे. संताप आलाच पाहिजे, अशी भावनाही व्यक्त केली. तसेच मणिपूरमधील सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही केली.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *