Breaking News

आदित्य ठाकरे यांची टीका, न्यायाला उशीर करणं फक्त आमच्यावर नाही तर… ट्विट करत केला राहुल नार्वेकर यांच्यावर वार

लोकसभा निवडणूका जवळजवळ येत आहेत. तसे राज्यातील अपात्र आमदारांबाबतचा निकाल लांबविण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत असा ठपकाही ठेवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ट्विटकरून निशाणा साधला.

यावेळी आपल्या ट्विट मध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, न्यायाला मुद्दाम उशिर करणं म्हणजे अन्याय करणंच आहे! फक्त आमच्यावर नाही, तर महाराष्ट्रावर! असे वक्तव्य केले.

तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मविआचं तत्कालीन सरकार कपटाने पाडून, त्या जागी घटनाबाह्य सरकार आणून भाजपाने महाराष्ट्रावर अन्याय केला. आता सभापती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात चेंडू असताना (ट्रिब्यूनल ची जबाबदारी असल्याने), असे दिसते की सभापती मुद्दाम विलंब करण्याचे डावपेच खेळून असंवैधानिक सरकारचं संरक्षण करण्यासाठी आपल्या क्षमतेच्या आणि चौकटीच्या पलीकडे जात आहेत असा आरोप केला.

पुढे आदित्य ठाकरे असेही म्हणाले की, जगातली सर्वात मोठी लोकशाही असा दावा करणाऱ्या भारतात घटनाबाह्य सरकारचं अशा प्रकारे संरक्षण केलं जाताना पाहणं हे संतापजनक आहे. सभापती लवकरच घाना येथे राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत, परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे घटनाबाह्य, असंवैधानिक सरकार आहे आणि ज्याला बेकायदेशीर मार्गांनी संरक्षणही दिलं जातंय? ह्या साऱ्यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असून, भारतात लोकशाहीच उरलेली नाहीये असे संकेत दिले जात आहेत अशी टीकाही केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मे २०२३ मध्ये आदेश दिलेला असल्याने, सभापती अजूनही जलद न्याय देतील, अशी आम्हाला आशा आहे. (अजूनही!) हे फक्त एका पक्षाबद्दल नाहीये, तर महाराष्ट्राबद्दल आहे, आपल्या राज्यातल्या लोकांबद्दल आणि इथल्या लोकशाहीबद्दल आहे! त्यांना कश्याप्रकारे वागवलं जाणार आहे ह्याबद्दल आहे! संसदीय लोकशाहीची तत्त्वं न पाळता आणि राज्यघटनेचं संरक्षण न करता, निर्णय पूर्ण होण्याआधी संसदीय परिषदेसाठी परदेश दौरा करणं हे अयोग्य ठरेल अशी आठवणही करून दिली.

शेवटी इशारा देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुद्दाम वेळकाढूपणा करणं म्हणजे घटनेच्या विरोधात असलेल्यांना सभापतींचं संरक्षण असणं! पण लक्षात ठेवा,
महाराष्ट्र पाहत आहे! भारत पाहत आहे! जग पाहत आहे! असा खोचक टोलाही लगावला.

Check Also

वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी

मुंबई काँग्रेसने गुरुवारी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून धारावीच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *