Breaking News

म्हाडा अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात ? मंत्र्याच्या कि शिवसेना आमदाराच्या गृहनिर्माण मंत्री, सुनिल राऊत आणि सुनिल शिंदे यांच्यापैकी कोणाची लागणार वर्णी

मुंबई: विशेष प्रतिनिधी

मुंबईसह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरांच्यादृष्टीने नेहमीच आशेच्या ठिकाणी राहिलेल्या म्हाडाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून चांगलीच मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेतून सुनिल शिंदे-सुनिल राऊत यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा म्हाडात रंगली आहे.

काही महिन्यापूर्वी म्हाडाचे अध्यक्ष पद विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे होती. मात्र कालावधीनंतरही त्यांनी म्हाडाचे अध्यक्ष पद सोडण्यास तयार नव्हते. तसेच गृहनिर्माण मंत्रालय स्वत:ला मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र नंतर हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिश्शाला जावून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली. मात्र फक्त गृहनिर्माण विभागाबरोबरच म्हाडाचे अधिकार स्वत:कडे घेण्यासाठी गृहनिर्माण मंत्री हाच म्हाडाच अध्यक्ष असेल अशा स्वरूपाच्या विधेयकाचा मसुदा तयार करून मंजुरीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविला. मात्र त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली नाही. तरीही म्हाडाच्या अनेक गोष्टींचे अधिकार गृहनिर्माण मंत्र्यांनी स्वत:कडे घेतले आहेत.

तर दुसऱ्याबाजूला शिवसेनेचे युवराज तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी स्वत:चा मतदारसंघ सोडणारे माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अद्याप तसाच प्रलंबित आहे. त्यातच वरळी विधानसभा मतदारसंघात बीआयटीच्या चाळी, बीडीडीच्या चाळीच्या पुर्नविकासाचे मोठे प्रकल्प आहेत. तसेच याच भागात शिवसेनेचे मतदार मोठ्या प्रमाणावर रहात आहेत. त्या सर्वांशी सुनिल शिंदे यांचा थेट संपर्क असल्याने  सुनिल शिंदे यांचे राजकिय पुर्नवसन करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे म्हाडाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सुनिल शिंदे यांच्यावर सोपविण्याचा निर्णय जवळपास आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.

तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधु सुनिल राऊत यांनीही म्हाडाचे अध्यक्ष पद आपल्यालाच मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. इतकेच नव्हे तर आपल्यालाच हे पद मिळणार म्हणून त्यांच्या म्हाडा वाऱ्या सुरु झाल्याची माहिती तेथील अनेक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अध्यक्ष पदासाठी सचिन अहिर यांचे नाव अंतिम झाल्याची चर्चाही सुरु झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या निर्णयानुसार सुनिल शिंदे यांच्या गळ्यात ही जबाबदारी पडणार कि संजय राऊत यांचे बंधु सुनिल राऊत कि दस्तुर खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यात पडणार याचे उत्तर लवकरच मिळेल. तोपर्यंत वेट अॅण्ड वॉच….

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *