Breaking News

पंतप्रधान मोदीमध्ये मंदीची आकडेवारी जाहीर करण्याची ताकद नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

नांदेडः प्रतिनिधी
देशात मोठी मंदी आल्याचे सांगितलं जातंय. ही मंदी कायम राहिली तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. इतके कारखाने आलेत पण किती आले ते सोडून किती कारखाने बंद झाले याचे आकडे मोदीनी द्यावे. पण हे आकडे द्यायची त्यांची ताकद नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. नांदेड येथील पक्षाच्यावतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
आज देशात लाखो तरुण बेकार आहेत. नाशिकमध्ये अनेक कारखाने असतानाही आर्थिक मंदीमुळे ५४ कारखाने बंद पडले आणि १६ हजार तरुण बेरोजगार झाले आहेत. आधीच बेकारी त्यात ज्यांच्या हाती काम आहे त्यांनाही बेकारीला सामोरे जाव लागतंय. यामुळे आज तरुणांची लग्न होत नाहीत, याबाबतीत काय करतय हे सरकार असा संतप्त सवालही त्यांनी केला.
हाताला काम किती दिले, किती शेतकऱ्याला वाचवले, शेतकऱ्यांचा फायदा काय केला ते सांगा. समाजात एकजुट करण्याची पावले काय टाकली ते सांगा पण यावर काहीच बोलत नाहीत.मात्र आज राज्यात मतं मागण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारला काही अडचण आली तर परदेशातून आयात करण्याची भुमिका हे सरकार घेतं. पण आपल्या शेतकऱ्यांना दोन पैसे देण्याची भूमिका यांची नाही. तर आत्महत्येच्या वाटेवर जाण्याची अपेक्षा ठेवायची या पध्दतीने कोणी शेतकऱ्यांकडे बघत असेल तर अशांना सत्तेतून हटवण्याशिवाय पर्याय नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या भल्यामध्ये आजच्या सरकारला रस नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही, तर कंपन्यांचे कर्ज माफ करतेय. जो भुक भागवतोय त्यांना कर्जमाफी नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली.
या राज्यात आणि देशात ६५-६६ टक्के लोक शेती करतात. आज चित्र हे वेगळेच दिसतेय. कर्जबाजारी झालेला सर्वात मोठा वर्ग लाखांचा पोशिंदा आणि दोन वेळेचा भुकेचा प्रश्न जो सोडवतोय तो संकटात आहे. आपल्याकडे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, विहीरीसाठी कर्ज काढलं जातं, परंतु पीक उध्वस्त होतं पण डोक्यावरच कर्ज मात्र कमी होत नाही. त्यावर बॅंक नोटीस काढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोठ्या उद्योगपतीनी कर्ज थकवलं तर बॅंका त्यांना सवलती देतात. काही दिवसापूर्वी धंद्यात उद्योगातून पैसे परत आले नाहीत. तर सरकारने ८६ हजार कोटी बॅंकेत भरले. पण आम्ही ७१ हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं. एकेकाळी धान्य आयात करणारा देश आज जगात तांदूळ निर्यात करणारा पहिल्या क्रमांकावर आहे. गहू निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसने नांदेड शहराचा विकास घडवला पण या सरकारने एक इंचदेखील विकास केला नाही. आजच्या राज्यकर्त्यांना टिका टिप्पणी केल्याशिवाय काहीच येत नाही. आज मोदी नाशिकमध्ये येत आहेत. पण विरोधी पक्षातील लोकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. घराबाहेर पडल्यास अटक करु. शासनाने आदेश काढले की, मोदी नाशिकमधून जाईपर्यंत कांदा बाजारात आणायचा नाही. यांना कांद्याचीही भीती वाटते. पण या पध्दतीने लोकशाही घालवण्याचे काम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवछत्रपतींच्या नावे सत्तेत आलेले हे सरकार महाराजांविषयी काहीच करत नाहीत. डॉ. आंबेडकरांविषयी काहीच करत नाही केवळ नावाचा वापर हे सरकार करत आहेत. छत्रपतींनी परकियांपासून राज्याचा बचाव होण्यासाठी किल्ले बांधले. हे किल्ले नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारी केंद्र आहेत. पण या सरकारने गडकिल्ल्यांवर छमछम बघण्याची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्राचा इतिहास बाजुला ठेवून एक चंगळवादाची संस्कृती राज्यात प्रस्थापित करण्याचे काम हे सरकार करत आहेत. अशांना थारा आपली जनता देणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी सरकारला दिला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *