Breaking News

विदर्भाच्या नातवाकडून १० रूपयांच्या शिव-भोजन योजनेसह विदर्भ विकासाचे बिगूल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून घोषणा

नागपूरः प्रतिनिधी
मी विदर्भाचा नातू असून माझ्यासाठी आजोळचे आर्शीवाद महत्वाचे आहेत. त्यामुळे विदर्भातील कोणतेही सिंचन प्रकल्प रखडले जाणार नसून सिंचनातील अनुषेश भरून काढणार आहे. तसेच या भागात उद्योग गोसीखुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करणार असल्याची घोषणा करत विदर्भाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची मदत लागेल अशी साद घालत १० रूपयांत शिव-भोजन योजना लवकरच जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्ताव आणि विदर्भ विकासाच्या अनुषंगाने मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर संयुक्तपणे उत्तर देताना वरील साद घातली.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनतेच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कार्यालय (CMO) सुरु करणार असल्याचे सांगत त्याचठिकाणी लोकांची कामे होतील. त्यासाठी मुंबईत यायची वेळ लोकांवर येणार नाही. विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्या आहेत. मात्र वर्धा आणि नागपूरच्या बैठका मुंबईत घेण्यात येणार आहेत. २०२२ पर्यत या भागातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असून सिंचनाचा अनुशेष शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट करत जर अनुषेश राहत असेल तर मला दाखवून द्या तो ही पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना आणखी २०० रुपये देणार असून २५०० रुपये प्रतिक्विंटल शेतकऱ्यांच्या हाती देणार असल्याची घोषणा करत विदर्भातील रखडलेले संत्रा प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वास नेणार असून राज्यातील जोडरस्त्यांच काम तडीस नेणार आहे. याशिवाय आदिवासी आणि कुपोषणाचे प्रश्न परिणामकारक सोडविणार असून कुपोषण प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी भागात मध्यवर्ती स्वयपांकगृहे उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
समृध्दक्षेत्रात पर्यटनवाढीला चालना देणार असून लोणार सरोवराच्या संवर्धानासाठी मोठी पावलं उचलण्यात येतील. नागपूर कर्करोग रुग्णालय वेळेआधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून डॉ. आंबेडकर पीजी इन्स्टीट्यूटही लवकरच कार्यान्वित होईल. फिशरी हबचे काम पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अवकाळी पावसाची मदत निश्चितपणे देऊ. केंद्राच्या मदतीसाठी विरोधकांना सोबत घेऊन जाऊ. गोरगरिबांना दहा रुपयात शिव-भोजन देणार असल्याची घोषणाही करत प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी पहिल्यांदा सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
मुंबईसह महाराष्ट्र केंद्राला भरभरून देतो. मात्र पंतप्रधान मंगोलियाला ४ लाख कोटी डॉलर देतात. मग महाराष्ट्राला का देऊ शकत नाहीत असा उपरोधिक सवाल करत मोदीजी हे भाजपाचे नाही, देशाचे पंतप्रधान असल्याचेही त्यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार आहे. समुद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार असून त्यावरील कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल. त्यामुळे व्याजापोटीचे अडीच हजार कोटी वाचणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
कृषी समृद्धी केद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करणार असून यातून ५ लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरू असून पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा करत विदर्भात पर्यटनाच्या सोयी-सुविधा वाढविणार असल्याचे सांगत विदर्भात मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *