Breaking News

रताळ्याला म्हणतंय केळं आणि दुसर्‍याच्याच लग्नात नाचतंय खुळं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंना टोला

नांदेड: प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक इतकी कठीण होते आहे की, त्यांना आता आपल्या प्रचारासाठी नेते आणि पक्षही किरायाने आणावे लागत आहेत, अशी जोरदार टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकर, नांदेड येथे केली आणि हे पक्ष आणि नेते आहेत तरी कोण तर ‘जे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं’ अशी अवस्था असलेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर तसेच इतर नेते यावेळी उपस्थित होते.

आम्हाला सभांसाठी मंच आणि खुर्च्या किरायाने आणाव्या लागतात. पण विरोधकांची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यांना माणसं, नेते आणि पक्ष किरायाने आणावे लागत आहेत आणि किरायाने आणले तरी कुणाला आणले जात आहे, जी पूर्वी होती मतदार नसलेली सेना (मनसे) आणि आता आहे उमेदवार नसलेली सेना (उनसे) अशी टीकाही त्यांनी केली.

जे नेहमी पहिल्या बॉलवर आऊट होतात, ते कायम शतकं ठोकणाऱ्या मोदीजींसारख्या फलंदाजाला बॅटिंग कशी करावी, याचे सल्ले देतात. होय मी बसवलेला मुख्यमंत्री आहे. पण, लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मला मुख्यमंत्रीपदावर बसविले आहे आणि याच मतदारांनी तुम्हाला घरी बसविले आहे. राज ठाकरेंनी नांदेडच्या सभेत बोलताना थोडा अभ्यास केला असता तर बरे झाले असते, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नेण्याचे काम मी करतो आहे. पण, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा करार २०१० साली अशोक चव्हाण यांनीच केला होता. हा करार रद्द करणारा मी होतो. महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रात परत आणण्याचे काम आपण केले. ज्यांच्या सभांसाठी अशोक चव्हाण आग्रही आहेत, त्या राज ठाकरेंना अशोक चव्हाण हे पूर्वी बेडूक म्हणायचे आणि आज त्यांनाच सभांसाठी बोलाविले जात आहे. इतकी वाईट अवस्था काँग्रेस पक्षावर यापूर्वी कधीही आली नसेल, अशीही टीका त्यांनी केली.

यापूर्वीच्या सरकारने नांदेडमधील शेतकर्‍यांना कर्जमाफी, थेट मदत, पीकविमा इत्यादीतून केवळ केवळ ५०० कोटी रूपयांची मदत केली गेली, मात्र,आम्ही अवघ्या ४ वर्षांत २२२६ कोटी रूपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. हे सरकार खऱ्या अर्थाने गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे. मोदींवर टीका करणार्‍यांनी मराठवाड्याचं वाळवंट कुणाच्या काळात झालं, याचं उत्तर दिले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *