Breaking News

पालघर, मेळघाटमधील बाईक ऍम्ब्युलन्स सेवा बंद पडल्याचा सरकारलाच पत्ता नाही भाजप-शिवसेना सरकारची जाहीरातबाजीमध्येही 'बनवाबनवी'! -विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करुन जनतेची दिशाभूल केली असून आता जाहिरातबाजीतही त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहीरातीत दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारची पाच वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली असून कोणताही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. असे असताना ‘सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी’, या जाहिरातीतून आपल्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, परंतु या जाहिरातबाजीतील दावाही खोटा निघाला आहे. आरोग्य विभागाच्या पानभर जाहिरातीमध्ये बाईक ऍम्ब्युलन्स सेवेमुळे ‘आरोग्यदायी झेप’ घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा करताना दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा त्यांनी केला.
ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईत १० बाईक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही सेवा सुरु करण्यात आली आणि त्यानंतर मेळघाट, पालघर, गडचिरोली या दुर्गम भागातही सेवेचा विस्तार करण्यात आला. पण सरकारचा कालावधी संपत आला तरीही सेवा सुरु करण्यात येणार असल्याचेच सांगितले जात आहे. पालघर, मेळघाटमध्ये १० बाईक्सच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेली सेवा तर वर्षभरातच कर्मचारी वर्ग नसल्यामुळे बंद करण्याची नामुष्की ओढवली असल्याची माहिती आहे, परंतु आरोग्य विभागाला त्याचा पत्ताच नसल्याचा आरोप त्यांनी केला.
२०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये ३३ लाख रुग्णांना या बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा लाभ झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात ३० बाईक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून ३३ लाख रुग्णांना फायदा, हा दावाच हास्यास्पद आहे. त्यातही ही सेवा ऑगस्ट २०१७ पासून सुरु झाली असताना २०१४ पासून सुरु झाली, हे कशाच्या आधारावर सांगितले जात आहे असा सवाल करत आरोग्य विभागाचे मंत्री शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतही खोटी माहिती देण्यात आलेली आहे. आरोग्यमंत्र्यांचा विभागाच्या कामापेक्षा प्रसिद्धीकडे जास्त कल असावा, त्यामुळेच खोटी व कपोलकल्पित माहिती देऊन न केलेली कामगिरी केली असे सांगण्यासाठी हा खटाटोप केलेला दिसत असल्याची टीका त्यांनी केला.
सरकारचा उताविळ कारभार पाहता, ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पिठ खातंय’, अशी अवस्था असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *