Breaking News

आरेप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंचे फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर तर मुनगंटीवारांना टोला आरे कॉलनीतील कारशेड कांजूर मार्ग येथील सरकारी जमिनीवर होणार

मुंबई: प्रतिनिधी

शहरातील जीवसृष्टी कायम रहावी यासाठी मुंबईत असलेल्या आरेच्या जंगलात उभारण्यात येत असलेल्या मेट्रो कारशेडचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मेट्रो कारशेड कांजूर मार्ग येथे होणार असून या कारशेडसाठी तेथील शासकिय जमिन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही सरकारी शुन्य किंमतीने अर्थात मोफत देण्यात आली असून त्यासंबधीचे आदेश कालच दिल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर देत जे (जंगल) अस्तित्वात आहे ते टिकविणे महत्वाचे असल्याचे सांगत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला.

सोशल मिडियाच्या माध्यमातून आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.

मागील सप्टेंबर महिन्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरे जंगलात होत असलेल्या कारशेडला स्थगिती देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करत येथील कारशेड स्थलांतरीत झाल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली. तसेच या कारशेडच्या अनुशंगाने जे बोगदे (टनेल) जमिनीत खोदले गेले, तेथील विद्युतीकरणाचे काम झाले त्याचा सर्व खर्च वाया जाणार असून चांत्रिकदृष्ट्या या भागात ३ आणि ६ मार्गाची मेट्रो एकत्रितरित्या चालविणे ही शक्य नसल्याचा मुद्दा फडणवीस यांनी उपस्थित करत हा निर्णय आर्थिकदृष्ट्या सरकारला परवडणारा नसल्याचे सांगितले होते.

त्याप्रश्नांला आज संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर दिले. फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई हे देशातील एकमेव असे शहर आहे ज्या शहराच्या मधोमध जंगल आहे. या जंगलात कारशेड उभारण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच रात्रीतून तेथील झाडे तोडण्यात आली. त्यामुळे या कारशेडच्या उभारणीस निवडणूकी आधी आपण विरोध केला. त्यानुसार तेथील कारशेड स्थलांतरीत करण्यात आला. तसेच आतापर्यत या प्रकल्पावर १०० कोटी जे खर्च झाले आहेत. ते वाया जावू देणार नसल्याचे सांगत तेथे जी इमारत उभारण्यात आली आहे. ती चांगल्या कामासाठी वापरण्यात येणार असून जे बोगदे तयार करण्यात आले आहेत त्यातून मेट्रो-३ आणि मेट्रो-६ च्या गाड्या एकत्रित धावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर आरेची ६०० एकर जमिन जंगल म्हणून राखीव करण्यात आल्याने आता येथील जमिन ८०० वर पोहोचली आहे. त्यामुळे ८०० एकराचे जंगल मुंबईत राहणार आहे. आधीच्या काही लोकांनी ५०० कोटी झाडे लावण्याची घोषणा केली. तसेच या झाडांमुळे पर्यावरण असंतुलन कमी होईल वगैरे सांगत होते. मात्र झाडे कुठे आहेत विचारले की, दिसतील कि हळूहळू अशी उत्तरे देत होते. आमच्या धोरणानुसार आता जे अस्तित्वात आहे ते टिकविणे महत्वाचे आहे, त्यानंतर आणखी नव्याने जंगले आणखी निर्माण करू असा उपरोधिक टोला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला.

तसेच ही जमिन कारशेडला उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदीत्य ठाकरे, सुनिल केदार, बाळासाहेब थोरात यांनी विशेष सहकार्य केल्याने त्यांना धन्यवाद देत असल्याचे सांगत याप्रकरणी पर्यावरण वादी कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *