Chief Minister inaugurates state-of-the-art Setu Suvidha centers in Mumbai suburbs

मुंबई उपनगरातील अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सेतू सुविधा केंद्र हा सरकार आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नसून सरकार आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड सेवा देण्याच्या दिशेने हे केंद्र भविष्यकालीन स्मार्ट प्रशासनाचा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या या जिल्ह्यात नागरिकांचे जीवनमान सुकर व्हावे या अनुषंगाने त्यांना वेगवान, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित सेवा मिळाव्यात या उद्देशाने मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने उभारलेल्या या केंद्रांचे लोकार्पण मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी उपस्थित होते.

शासनाच्या 100 आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा व ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या उपाययोजनांचा जिल्ह्यातील आरटीएस सेवा वेळेवर वितरीत करण्यावर सकारात्मक परिणाम झाला असून एप्रिल 2025 मध्ये 59.48 टक्के असलेले हे प्रमाण आता ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढून 90.28 टक्क्यांवर गेले आहे. प्रशासकीय पातळीवर हे प्रमाण 100 टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नवीन सेतू सुविधा केंद्रे डिजिटल क्यू मॅनेजमेंट, टोकन प्रणाली, रियल-टाइम स्टेटस डिस्प्ले आणि आरामदायक वेटिंग एरिया अशा अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असून, नागरिकांचा वेळ वाचवणे आणि सेवा प्रक्रिया सुलभ करणे हे या केंद्रांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासोबतच, जिल्ह्यात फिरते सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांना घराजवळ किंवा घरपोच सेवा अर्ज करता येणार आहेत. नागरिकांना सेतू कार्यालयात एकदाच अर्ज भरण्यासाठी आल्यानंतर पुन्हा दाखला घेण्यासाठी येण्याची गरज पडू नये, नागरिकांचा वेळ वाचावा आणि घरबसल्या व्हॉटस्ॲप वर दाखला मिळावा यासाठी ‘आपले सरकार आपला दाखला थेट आपल्या हातात’ असा व्हॉटस्ॲप सर्विस डिलिव्हरी उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेवांविषयीची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी व्हॉटस्ॲप चॅटबॉट सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून 238 नवीन आपले सरकार सेवा केंद्रही कार्यान्वित झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

About Editor

Check Also

डॉ अशोक वुईके म्हणाले की, आदिवासी समाजाचा इतिहास व संस्कृतीच्या जतनासाठी संशोधनाची गरज आदिवासी अध्ययन व संशोधन उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन

आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सखोल संशोधन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *