Breaking News

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती महोत्सवात… भाजपा कार्यकर्त्यांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत. रयतेसाठी कल्याणकारी राजा म्हणून महाराजांची ख्याती आहे; म्हणून राजमाता जिजाऊ यांनी महाराजांना राज्याभिषेकाचा सांगितलेला अर्थ आजच्या पिढीपर्यंत प्रबोधन, कीर्तन आणि विविध उपक्रमातून पोहोचविण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा शिवसेना सरकारने केला. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५०व्या वर्षांचे निमित्त साधत वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवि, उपाध्यक्ष माधव भंडारी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास असणाऱ्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५०वे वर्ष उत्साहात साजरे करायचे आहे. या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार जगभरात पोहोचावे असा मानस आहे. येणाऱ्या २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करुन सर्व शिवप्रेमींना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी सुरू आहे. यामध्ये भाजपाचा प्रत्येक कार्यकर्तादेखील सहभागी व्हावा अशी इच्छा आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, संपूर्ण जगातील लोक या सोहळ्याकडे कुतुहलाने बघत आहेत. शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व, पराक्रम आणि विचार नव्या पिढीसमोर ठेवण्याची ही एक संधी आहे. महाराजांची जगदंबा तलवार आणि अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखे लंडनहुन भारतात आणण्याचा संकल्प केला असून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जगभरात पसरलेल्या भारतीयांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल नितांत आदर आहे, म्हणूनच मॉरिशस येथे महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला; त्याच धर्तीवर लंडन मध्येही पुतळा उभारावा असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाणता राजा, १ जून ते ७ जून रायगडच्या पायथ्याशी जाणता राजा, शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची गेट वे ऑफ इंडिया येथे प्रदर्शनी, गाव, तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर प्रबोधनकार, कीर्तनकार यांच्या माध्यमातून महाराजांचे विचार घराघरांत व मनामनांत पोहोविले जातील.
एक कोटी शिवभक्त राज्यात तयार करण्याचा मानसदेखील ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. प्रत्येकस्तरावर समित्या करुन त्या समित्यांमध्ये सर्वांना समाविष्ट करुन घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात फक्त ८ टक्के महिलांना उमेदवारी

देशात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. देशांतर्गत एकूण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *