Breaking News

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांवर होणार कारवाई विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले संकेत

केंब्रिज विद्यापीठात स्वा.सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांनी काल राहुल गांधी यांच्या वक्तव्यप्रकरणी आंदोलन करताना गांधी यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारो आंदोलन केले. त्यातच सूरत न्यायालयाने दिलेल्या निकालाची तात्काळ दखल घेत राहुल गांधी यांची वायनाडची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय आज मोदी सरकारने जारी केला. त्यावरून विरोधी बाकावरील आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घटनांवरून अखेर संतापलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या दोन्ही प्रकरणात आंदोलन करणाऱ्या घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले.

तसेच विधान भवनाच्या परिसरात घडत असणाऱ्या या घटनांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करतानाच आमदारांसाठी आचारसंहिता जाहीर करताना मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी आज शुक्रवारी विधानसभेच्या सभागृहात जाहीर केले.

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन करताना गुरुवारी सत्ताधारी पक्षांतील काही आमदारांकडून राहुल गांधी यांच्या पोस्टर्सला जोडे मारो आंदोलन केले. याप्रकरणी काँग्रेसच्या आमदारांनी शुक्रवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण केला. शुक्रवारी विधानसभेचे नियमित कामकाज सुरु होताच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी यासर्व प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. हा सर्व प्रकार गंभीर असून काल झालेल्या आंदोलनामध्ये तालिका अध्यक्षांचाही समावेश असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली.

याविरोधात भाजपाचे आशिष शेलार यांनी विरोधकांच्या आंदोलनाबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. काल झालेल्या घटनेचे समर्थन करता येणार नाही. असंसदीय प्रकार आम्हांला मान्य नाही. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून विरोधकांकडून खोके आणि गद्दार सरकार बोलले जाते, त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी यावेळी केली. यामुळे सभागृहात विरोधकांनी घोषणाबाजी सुरु करित मोदी सरकार चोर हैं, च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यासर्व प्रकारामुळे विधानसभेचे कामकाज प्रथम २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ सुरु केल्याने सभागृहाचे कामकाज एकूण तीनवेळा तहकूब करण्यात आले.

दरम्यान, सभागृह सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. त्यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले की, विधान भवनाच्या आवारात काल जी घटना घडली. ती अत्यंत चुकीची होती, याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. त्याचप्रमाणे आज सभागृहात काही सदस्यांकडून पंतप्रधानांबाबत जे वक्तव्य करण्यात आले. तेही चुकीचे असून ते देखील शोभनीय नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री आणि इतर दोन्ही बाजूच्या सदस्यांसोबत माझी चर्चा झाली आहे. यासंदर्भात सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती तपासून घेणार आहे. त्यानंतर उद्या यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेईल, असे नार्वेकर यांनी जाहीर केले.

तर वारंवार विधानभवनाच्या आवारात अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्याबाबत असो किंवा पंतप्रधानांसह इतर नेत्यांसंदर्भात अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे यासंदर्भात विधानभवनाच्या आवारात आचारसंहिता काय असावी, याबाबत मार्गदर्शक तत्वे लवकरच जाहीर करण्यात येणार असून ती सर्व सदस्यांना पाळणे बंधनकारक असणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तर यावेळी बाळासाहेब थोरात यांनी देखील जे काही वर्तन झाले. त्यावर निर्णय घेण्याची मागणी यावेळी लावून धरली.

मोदींचा आणि सावरकरांचा अपमान सहन करणार नाही – मुख्यमंत्री

काल जी घटना घडली, त्याचे समर्थन करता येणार नाही. पण आज सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे हा देशाचा अपमान आहे. गेली आठ महिने मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून त्यांना गद्दार म्हणणे, खोके म्हणणे, मिंधे म्हणणे हे कोणत्या आंचारसंहिते बसते, असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना केला. तर सभागृहाचे पावित्र जपण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी अधोरेखित केले. तर सावरकरांचा वारंवार अपमान करणे, हे देखील देशद्रोह्यांचेच काम आहे. देशाची किर्ती जगभरात पोहचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता कधीच सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशामधील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य तुमच्याकडून करण्यात येते. जर लोकशाही धोक्यात आहे तर देशात भारत जोडो यात्रा कशी काढली, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित करीत विरोधकांना लक्ष्य केले. तुमच्या बड्या नेत्यांबद्दल आम्ही काहीही बोललो नाही. पण तुम्ही देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलणार असाल तर आम्ही ते सहन करणार नसल्याचे स्पष्ट करताना यापुढे बोलताना सर्वांना तारतम्य बाळगले पाहिजे, या सदनाचा मान राखणे गरजचेचे असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांच्या मातोश्रीचे निधन झाले. अत्यंविधी झाल्यानंतर ते कर्तव्यावर गेले. त्यांना तुम्ही चोर कसे म्हणता, असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *