Breaking News

बाळा नांदगांवकरांच्या ट्विटवर सचिन सावंतांचा खोचक सवाल, अयोध्या दि ट्रॅप चा रचेता कोण? भाजपा खासदार बृजभूषण सरण सिंगवरील मनसेच्या भूमिकेवर केला सवाल

काही महिन्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र बृजभूषण सिंग हे पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला हजर राहिले. यावेळी खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वादाबाबत ट्विट करत सूचक विधान केले. यावेळी ट्विटमध्ये बाळा नांदगांवकर यांनी बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंची भूमिका पटली असावी, असे वक्तव्य केले. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंतानी बाळा नांदगावकरांना खोचक सवाल करत टोला लगावला.

मग “अयोध्या दि ट्रॅप” चित्रपटाच्या कथेचा रचेता कोण होता बरं? का ते पण नेहमीप्रमाणे मनसे? असो! भाजपाने लावलेला ट्रॅप भाजपानेच सोडवला असे दिसते! असं सचिन सावंत यांनी बाळा नांदगावकर यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

बाळा नांदगांवकर म्हणाले की, उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी नुकताच पुणे दौरा केला, मागे यासंदर्भात आम्हाला विचारण्यात आले होते की त्यांच्या दौऱ्याला मनसे विरोध करणार का? त्यावेळी आम्ही “अतिथी देवो भव” ची भूमिका मांडली. आज त्यांनी सुद्धा अयोध्येत राज साहेबांचे स्वागत केले जाईल अशीच भूमिका मांडली. अनेकदा राजकीय भूमिका या गैरसमजुतीतून घेतल्या जातात. राज साहेब हे कधीच कोणाचाही द्वेष करत नाहीत तर प्रत्येक राज्यातील तरुणांना प्रथम प्राधान्य मिळावे केवळ एवढीच त्यांची भूमिका असते हे बृजभुषण सिंह यांना देखील लक्षात आलेच असेल व त्यामुळे त्यांचा देखील गैरसमज दूर झाला असेल हे त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते, असे ट्विट केले.

दरम्यान पुण्यात आल्यानंतर बृजभूषण सरण सिंग म्हणाले होते की, राज ठाकरे यांचा मी सैद्धांतिक मुद्यावर विरोध केला होता. त्यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाहीत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये कधीच दुरावा नव्हता. दोन्ही राज्यांचे आपसात प्रेम आहे. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. माझाही कधी महाराष्ट्राला विरोध नव्हता अशी भूमिका प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली होती.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *