Breaking News

दिपक केसरकर म्हणाले, चित्रा वाघ म्हणत असतील तर आणखी चौकशी होईल मंत्री संजय राठोड यांच्या मागणीवरून केला खुलासा

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. परंतु या १८ मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांचा समावेश करण्यात आल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. या टीकेवरून आता शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
मंत्री दिपक केसरकर हे पुण्यात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना दिपक केसरकर म्हणाले, जर पुढील काळात त्यांच्यावर काही दोष आढळला. एकतर असं आहे की कुठलाही दबाब हा पोलीस विभागावर येणार नाही. महिलांच्याबाबतीत आमचा दृष्टीकोन वेगळा आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भावना आहे. त्यामुळे जर चित्रा वाघ म्हणत असतील की या प्रकरणात अधिक चौकशी झाली पाहिजे तर, संजय राठोड यांची ती चौकशी देखील होईल असे म्हणाले.
याशिवाय मी आपल्याला खात्री देतो की निपक्षपातीपणे ती चौकशी होईल. परंतु जर ते दोषीच नसतील तर त्यांना मंत्रिमंडळातून दूर ठेवावं, असं का म्हटलं जातय? हा देखील एक भाग आहे. जर ते दोषी आढळले असतील तर निश्चितपणे त्यांना घेतलंच नसतं असेही ते म्हणाले.

तसेच संजय राठोड यांच्यावर हा आरोप कित्येक महिन्यांपूर्वी केला गेला होता, जवळजवळ वर्ष झालं. त्या दरम्यान जी चौकशी झाली, त्यात ते कुठेही दोषी आढळले नाहीत. त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आलेलं नाही. एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व ज्यावेळी ते करतात, त्यावेळी तुम्ही लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि अशा शेकडो लोकांनी जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी देखील आश्वासन दिलं होतं, की जर दोष त्यांच्यावर नाही आला तर आम्ही पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेऊ. त्यांनी आपलं वचन पूर्ण केलेलं नसलं, तरी हे एक बंजारा समाजाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं वचन होतं. त्याची पूर्तता व्हायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

आमच्याकडे दोन अपक्ष मंत्री होते आणि दोघांपैकी एकालाच घेतलं असतं तर वेगळा संदेश जाऊ शकला असता. बच्चू कडू हे खरंतर ज्येष्ठ आहेत, ते एका पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत. आमचे अत्यंत प्रिय असे आमदार आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसऱ्या टप्प्यात ठेवला जाणार आहे, तसं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे. माझे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत, मी देखील त्यांची भेट घेईन. असं रागवण्यासारखं काही नाही, कारण मला स्वत:ला खात्री नव्हती की मी सुद्धा येऊ शकेन की नाही मंत्रिमंडळात, अशी परिस्थिती होती असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. विरोधकांकडे काही मुद्दे शिल्लक नाहीत. अगोदर काय म्हणायचे की आमच्यातील १५-२० लोक परत येणार, परंतु प्रत्यक्षात आम्ही जेव्हा परत झालो तेव्हा त्यांच्यात असलेल्यांपैकी एक कमी झाला आणि आम्ही जर एकत्र राहिलो तर आणखी कितीतरी लोक कमी होणार आहेत. कारण, लोकांची कामं होत नव्हती ना? परंतु उठाव करायला एक धैर्य लागतं, प्रसंगी ते धैर्य ते दाखवू शकले नाहीत, नाहीतर एक दोन वगळता सगळेच्या सगळे आमदार या उठावात सहभागी झाले असते, याची मला खात्री आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *