Breaking News

आता रश्मी ठाकरेनींही खोचला पदर, केली संपर्क साधायला सुरुवात बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा एकनाथ शिंदे यांनी फडकावला. त्यानंतर जवळपास शिवसेनेच्या ३७ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. हे बंड क्षमविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न करूनही क्बंड काही केल्या क्षमण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पदर खोचत बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याची माहिती पुढे येत आहे.

एकाबाजूला बंड क्षमत नसल्याचे दिसून येताच शिवसेनेकडून पहिल्या टप्प्यात १६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्षांकडे याचिका दाखल केली. तसेच त्यासाठी ४८ तासांची मुदत दिली. मात्र तरीही बंडखोर आमदारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर बंडखोरांच्या विरोधात कठोर भूमिका स्विकारण्याची रणनीती स्विकारण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींशी थेट संपर्क साधून बंडखोरांना चर्चेसाठी मुंबईत आणण्याचे आवाहन करत त्यांना काय हवे, नको याबाबत विचारणा करत असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बंडखोरांचे मन वळवण्यात अपयशी ठरले आहेत. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, आता या राजकीय लढतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधत त्यांना आमदारांसोबत बोलण्यासाठी वळविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेही सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही बंडखोर आमदारांशीही मेसेजद्वारे संवाद साधला आहे. तर काही बंडखोर आमदार शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत. तसेच बंडखोर आमदारांकडूनही शिवसेनेसोबत असल्याची वक्तव्ये सातत्याने येत आहेत. त्यामुळे शिंदे गटात संभ्रम निर्माण होत आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेला हा राजकीय गोंधळ २१ जूनच्या सकाळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि काही आमदारांसह महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बंड करत सुरतला गेले तेव्हा सुरू झाला. नंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गेले. हे बंडखोर आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालापासून नॉट रिचेबल होते. ते सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. त्यानंतर अपक्षांसह अनेक आमदार बंडखोर छावणीत दाखल झाले आहेत.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *