Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आंदोलनाने आणि “या” पध्दतीने होणार साजरा राष्ट्रवादीचा १० जूनला २३ वा वर्धापन दिन ; राष्ट्रवादी सप्ताह आणि विविध प्रश्नांसंबंधी आंदोलने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन १० जून रोजी साजरा करण्यात येत असून प्रत्येक घरावर राष्ट्रवादीचा झेंडा व दारावर स्टीकर आणि राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह व १६ जूननंतर विविध प्रश्नांवर जिल्हास्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी संपर्क ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धापन दिनी एक नवा कार्यक्रम पक्षाने हाती घेतला आहे असेही त्यांनी सांगितले.
८ ते १० जून रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे मंत्री व राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या समाज उपयोगी निर्णयांची माहिती द्यायची आहे. १० जून रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी १०.१० वाजता झेंडावंदन होणार आहे तर सर्व जिल्हाध्यक्षांनी जिल्हयात पक्ष कार्यालयासमोर झेंडावंदन करुन कार्यकर्ता मेळावा घ्यावयाचा आहे.

या वर्धापन दिनापासून प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कायमस्वरूपी उभारायचा आहे. याचबरोबर घराच्या दारावर पक्षाचा स्टीकर लावायचा आहे.
१० ते १६ जून रोजी राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिक सन्मान, पर्यावरणविषयक जनजागृती, पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या विचारांवर आधारित व्याख्यान आयोजन, याशिवाय तालुका, जिल्हास्तरावर युवक, युवती, विद्यार्थी यांच्याकरीताही वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हयातील महिला अध्यक्षांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करावे.

१६ जून रोजी सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत विविध प्रश्नांसंबंधी आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले आहे. या आंदोलनात महागाई, बेरोजगारी, ओबीसी आरक्षण व विरोधी पक्ष करत असलेली दिशाभूल, केंद्रसरकारमधील भाजप पक्षाच्या नेत्यांकडून महिलांचा होणारा अपमान, शेतकर्‍यांच्या समस्या आदींचा समावेश असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.

जेपी नड्डा यांनी “त्या” वक्तव्याबद्दल वैयक्तिक माफी मागावी

हेतुपुरस्कर पैगंबरांचा अपमान करणाऱ्या भाजपा प्रवक्त्याच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत असून भाजप प्रवक्त्यांना अशाप्रकारचे प्रशिक्षण देते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
भाजपाचे प्रवक्ते सतत विष ओकणारे… द्वेष करणारे झाले आहेत. त्यांच्या कृत्यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही भरून न येणारी अशी हानी झाली आहे असेही ते म्हणाले.

भाजपाच्या एका विशिष्ट प्रवक्त्याने केलेल्या सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील विधानावर तात्काळ अ‍ॅक्शन घेऊन काही अरबी देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी तर भारतीय पंतप्रधान मोदींचे छायाचित्र कचऱ्याच्या डब्यावर लावले आहे जे पूर्णपणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विनंती केली की, त्यांनी आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून भारतीय पंतप्रधानांचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि भारतीय उत्पादनांवर झालेला बहिष्कार उठवावा अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण मुस्लिम जातीची वैयक्तिक माफी मागावी. भाजपने सर्व धर्माचा आदर करायला शिकावे अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

पिडीत महिला अपहरण प्रकरणी एच डी रेवन्ना यांना अटक

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल-भाजपाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने घरातील महिलेवरच जबरदस्ती करत बलात्कार केल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *