Breaking News

माझी चौकशी करा ! फडणवीसांचे सरकारला खुले आव्हान दोनवेळा पुन्हा सभागृहाचे कामकाज तहकूब

मुंबईः प्रतिनिधी

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच चौकशी करण्याचे सरकारला आव्हान दिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच पंचाईत झाल्याने अखेर गोंधळातच पुढील कामकाज घेण्याची पाळी महाविकास आघाडी सरकारवर आली. तर पुन्हा दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

मोहन डेलकर आणि मनसुखे हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन केल्याशिवाय विधानसभेचे कामकाज चालू देणार नसल्याचा भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाने घेतली. त्यामुळे जवळपास पाच वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

त्यानंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन्ही मृत्यूप्रकरणी निवेदन करताना म्हणाले की, २२ फेब्रुवारी २०२१ रोजी दादरा नगर हवेलीचे सात वेळा निवडूण आलेले खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येवून आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या जाचामुळे आपण मुंबईत येवून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. प्रफुल्ल खेडा पटेल हे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून कार्यरत होते. सध्या हे दादरा नगर हवेलीचे प्रशासक आहेत. मी मुंबईत आत्महत्या केल्याने मला न्याय मिळेल असा आशावाद डेलकर यांनी आपल्या नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आणि येथील प्रशासनावर विश्वास असल्याची ही त्यांनी यावेळी नोट मध्ये नमूद केल्याचे स्पष्ट केले. भाजपाच्या खासदार आणि छत्तीसगडमधील सनदी अधिकारी राकेशकुमार श्रीवास्तव यांनीही नागपूरात येवून आत्महत्या केली. यावरून या सर्वांचा महाराष्ट्राच्या प्रशासनावर किती विश्वास आहे हे दिसून येते. तसेच या प्रकरणाचा स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहिर केले.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने एटीएसकडून चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देत विरोधकांकडे जर काही आणखी पुरावे असतील त्यांनी सरकारला द्यावे या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर याप्रकरणाचा तपास एनआयएकडूनही याचा तपास करण्यासंदर्भात आजच पत्र आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांच्या उत्तराने विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे समाधान न झाल्याने ते पुन्हा म्हणाले की, तुम्हाला पटेल यांचा पक्ष आठवला आणि सचिन वाझे यांचा पक्ष नाही का आठवडा असा सवाल करत सचिन वाझे २००८ साली कोणत्या पक्षात प्रवेश केला? ते आठवले नाही का? असा सवाल करत किती दिवस सचिन वाझे यांना पाठिशी घालणार आणि कोणासाठी पाठिशी घालत आहे? असा सवाल करत सचिन वाझेंना निलंबित करा अशी मागणी केली. वाझे यांना न्यायालयाने निलंबित केल्याने त्यांना परत घेता येत नव्हते. परंतु सरकारने एक कमिटी दाखवून त्यांना पुन्हा रूजू करण्यात आले.

त्यावर देशमुख यांनी हरकत घेत न्यायालयात प्रकरण असताना त्यावर बोलता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

पुन्हा फडणवीस यांनी देशमुख यांचा मुद्दा खोडून काढत युन्नुस ख्वाजाच्या आईची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली नसल्याचे सांगत याप्रकरणी बोलता येते असे स्पष्ट केले.

तसेच अजून किती काळ वाझेला पाठिशी घालणार असा सवाल करत आता तर मला तुमच्यावरच संशय येत असल्याचा टोला गृहमंत्र्यांना फडणवीसांनी लगावला.

याप्रश्नी पटोले हे बोलायला उभे रहात म्हणाले की, विरोधी पक्षनेते जे काही बोलत आहेत ते सीडीआर त्यांच्याकडे कसे आले? विरोधी पक्षनेत्यांची चौकशी करा अशी मागणी केली.

त्यावर पुन्हा फडणवीस यांनी होय मी आणले सीडीआर माझे सरकारला खुले आव्हान आहे की करा माझी चौकशी असे म्हणत एकप्रकारे सरकारला आव्हान दिले. दरम्यान भाजपाचे सदस्य ये सरकार खुनी है अशा घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुढील कामकाज पुकारले.

यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांकडून जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यात येत असल्याने त्यांना बाहेर काढा अशी मागणी अध्यक्षांकडे केली. तसेच अन्वय नाईक प्रकरणात यांच्या गोस्वामीला बेड्या पडतील म्हणून सचिन वाझेंचे प्रकरण हे सारखे उचलून धरत असल्याचा आरोप विरोधकांवर केला. विशेष म्हणजे याच सचिन वाझे यांच्याकडे अन्वय नाईक प्रकरण तपासासाठी होते. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विसरले का? असा सवाल केला.

त्यावर फडणवीस यांनी भास्कर जाधव हे फक्त धमक्या देण्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यांच्या अशा धमक्यांना आम्ही घबरत नाही भीक घालत नाही. सरकारने याप्रकरणीही माझी चौकशी करावी असे आव्हान देत मी गृहमंत्र्यांना आव्हान देतो करा माझी चौकशी करा माझी चौकशी करा असे सांगत पुन्हा आव्हान देतो. परंतु भाजपा सदस्यांचा गोंधळ जास्तच वाढल्याने अखेर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *