Breaking News

हिरेन आणि डेलकर आत्महत्येवरून सेना-भाजपामध्ये रंगला सामना विधानसभेचे कामकाज तहकूब

मुंबई : विशेष प्रतिनिधी

ॲटालिया इमारतीच्या जवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालक मनसुख हिरेन आणि दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपाचे सदस्य पहिल्यांदाच आमने-सामने आले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाची प्रतच विधानसभेत वाचून दाखवित या प्रकरणात सचिन वाझे यांचा स्पष्ट सहभाग असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करत हिरेन यांचा मृत्यू होण्यापूर्वी सलग तीन दिवसांपासून मनसुख हे सचिन वाझे यांच्या सोबत होते. तसेच या प्रकरणात सापडलेली गाडी ही तीन महिन्यापासून वाझे यांनी वापरण्यास घेतली होती. त्याचबरोबर या प्रकरणात अटक होण्यास सचिन वाझे यांनी हिरेन यांना सांगितल्याची माहिती स्वतः मनसुख हिरेन यांनी घरी आल्यावर आपल्याला  सांगितल्याचा जबाब मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी पोलिसांना दिल्याचे गौप्यस्फोट केला.

याशिवाय सचिन वाझे यांच्या फोनचे शेवटचे लोकेशन ज्या ठिकाणी विठ्ठल गावडे हा जिथे राहतो तेथे आढळून आले. तेथून ४० कि.मी अंतरावर हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. आता इतके पुरावे असताना सचिन वाझे यांना २०१ कलमाखाली का अटक करण्यात येत नाही असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले.

त्यावर सांसदीय कार्यमंत्री अनिल परब म्हणाले की, मनसुख हिरेन यांच्याविषयीचा तपास सुरु आहे. त्यात जे असेल ते बाहेर येईल. मात्र खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येवून आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट अनेक भाजपाच्या नेत्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.

अनिल परब यांच्या हल्ल्यावर फडणवीस यांनी पलटवार करत डेलकर यांची सुसाईड नोट माझ्याकडे आहे. हि बघा यात त्यांनी कोणत्याही नेत्यांचे नाव नसून त्यातील तेथील प्रशासकाचे नाव असल्याचा खुलासा केला.

त्यामुळे शिवसेनेला स्वतःला बचावाच्या भूमिकेत जावे लागले. त्यावरून भाजपा सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोरील दालनात जमा होण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडी सरकारचे सदस्यही भाजपा सदस्यांच्या दिशेने जाण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरुवातीला १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर काही मिनिटांनी पुन्हा सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *