Breaking News

पंगू लंघयते गिरी आदिवासी महिलांची गती ठरलीय सुग्रती

अमरावती: प्रतिनिधी
पंगू लंघयते गिरी, हा वाक्प्रचार आपल्यापैकी बहुतेकांना माहित असेल. पंगू म्हणजे पांगळी व्यक्ती, म्हणजेच दिव्यांग व्यक्ती पर्वत कसा चढणार हा प्रश्न सर्वसामान्यपणे कुणालाही पडेल. मात्र प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी अंगी असेल तर दिव्यांग व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते. याचे जिवंत उदाहरण आहे अमरावती जिल्ह्यातील सुग्रती या तरुणीची..
चिखलदरा येथील अतिदुर्गम भागातील सलोना या गावात राहणाऱ्या सुग्रती या अपंग मुलीने आपल्या अपंगत्वावर मात करून स्वतःचे व परिवाराचे तसेच गावामधील महिला बचत गटातील महिलांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वावलंबी बनवण्याचा काटेकोरपणे सुग्रती प्रयत्न करते आहे.
सुग्रती रामकिसन मेटकर हिचा जन्म १६ फेब्रुवारी १९८० मध्ये सलोना या गावातील एका अतिशय गरीब कुटुंबात झाला, तिचे वडील लोहार काम करत होते तर आई हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असे. या कुटूंबाची अतिशय हलाखीची परिस्थिती होती. तिला नऊ बहिणी व दोन भाऊ असे अतिशय मोठे कुटुंब होते. अशा कठीण परीस्थितीत जीवनाशी दोन हात करतांना एके दिवशी दुर्दैवी प्रसंग तिच्या आयुष्यात घडला, तिचे आई वडील घरी नसतांना भावंडासाठी ती जेवण तयार करीत होती. नकळत तिचा पाय विस्तवावर पडला आणि पायाला गंभीर इजा झाली व तिच्या पायाला अपंगत्व आले, तेव्हापासून तिच्या जीवनाच्या लढ्याला सुरुवात झाली. जीवनातील असंख्य दुखः सहन करत व अपंगत्वामुळे होणाऱ्या त्रासांना तोंड देत जीवनाचा प्रवास सुरु असतांना २००८ साली सुग्रतीची भेट महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम) द्वारा स्थापित सिपना लोकसंचालीत साधन केंद्र, चिखलदरा येथील सहयोगिनी ताई यांच्यासोबत झाली आणि हाच तिच्या आयुष्याचा कायापालट करणारा क्षण ठरला.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गावामध्ये नवीन महिला बचत गट स्थापन करण्याचे काम सुरु असतांना सहयोगिनी ताईच्या मार्गदर्शना खाली सुग्रतीने “ख़ुशी महिला बचत गटाची स्थापना केली. जणू आता तर सुग्रतीच्या जीवनाला नवीन वळणच मिळाले होते. बचत गटाला प्रथम २०,००० रु. फिरता निधी मिळाला यामध्ये तिने गटातील महिलेला एक-एक शेळी खरेदी करून दिली व एका व्यक्तीला रोजगार मिळावा या उद्देशाने सर्व शेळ्या वेगवेगळ्या न ठेवता एकत्र ठेवून त्यामधून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. गटातील महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे व गटाद्वारे होणारे फायदे तिच्या लक्षात येऊ लागले, असतांना तिने जणू काही ठाम निर्णयच घेतला की गटाच्या माध्यमातून स्वतः व गटांतील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे व महिलांची आर्थिक पातळी उंचवावी यासाठी सर्व गावातील महिलांना एकत्रित करून सहयोगिनी ताईच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले व बचतीला सुरुवात झाली आणि महिलांचा आर्थिक, सामाजिक विकास होऊ लागला.
महिलांना होणारे काबाडकष्ट दूर करण्याकरिता गावामध्ये दळण केंद्र ,शेवल्या ,पापड, मिरची कांडप यंत्र यासाठी २०१७-२०१८ या वर्षात मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत महिलांच्या मागणीनुसार महिला आर्थिक विकास महामंडळ व सिपना लोकसंचालीत साधन केंद्र, चिखलदरा, द्वारे ग्राम उद्योग स्थापन करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला. गावामध्ये मोह, गुल्ली, जवस, जागणी जास्त प्रमाणामध्ये होत असल्यामुळे ऑईल मिल देण्याची मागणी करण्यात आली. सर्व गटातील महिलांची बैठक घेऊन महिलांना स्वता:च्या पायावर उभे होण्याकरिता निसर्गाने दिलेले महा दान मोहफुले, बांबू, जवस, मध, दुध, जागणी, यामधून काही उद्योग निर्माण करण्याकरिता व आदिवासी महिलांची भटकंती म्हणजे मुलभूत (अन्न,वस्त्र.निवारा ) गरजा पूर्ण करण्याकरीता दूरवर गावोगावी रोजगारासाठी भटकंती करावी लागत होती. या सर्व गोष्टींवर आळा बसावा म्हणून आपल्या गावातच काही रोजगार निर्मीतीचे उद्दिष्ट घेऊन सर्व महिलांच्या सहमतीने ग्रामउद्योग आपल्या गावात स्थापन व्हावा, या उद्देशाने सहयोगिनी ताईच्या मार्गदर्शनाखाली सिपना लोकसंचालीत साधन केंद्र, चिखलदरा येथे ग्रामउद्योगाची मागणी करण्यात आली. त्यानंतर सुग्रतीचे ध्येय होते ते महिलांचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करून ग्राम उद्योगाची उभारणी करण्यात आली.
या ग्राम उद्योग केंद्राकरिता मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत निधी सिपना लोकसंचालीत साधन केंद्र, चिखलदरातर्फे देण्यात आला. मग जणू सुग्रतीच्या स्वप्नाला पंखच फुटले ग्राम उद्योग केंद्र, सलोना याला मेळघाट ग्राम उद्योग केंद्र, असे नाव देण्यात आले. मेळघाटातील रानमेवा, मोहफुल, जवस, जगनी यापासून तेल बनविण्यासाठी ऑईल मिळवून दिले, जय महालक्ष्मी गटांतील दहा महिलांना शेवाळी मशीन ,शांती महिला बचत गटातील दहा महिलांना आटाचक्की, पूर्वा महिला बचत गटातील अकरा महिलांना पापड मशीन व मिरची कांडप यंत्र देण्यात आले.अशा प्रकारे गटातील सर्व महिलांना मेळघाट ग्राम उद्योग केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळाला, अशारितीने सुग्रतीच्या कठोर परिश्रमाला यश आले.
सलोना या गावामधील महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. बँकेचे व्यवहार, अंतर्गत व्यवहार ,मुलांचे शिक्षण, तसेच आरोग्यासंबधी काही कारणासाठी महिला कोणत्या सावकाराच्या पुढे हात पसरत नाहीत. आपल्या गटातील बचतीचा वापर उद्योग व अर्थसहाय्य स्वत:च करतात. फक्त चौथापर्यंत शाळा शिकलेली सुग्रती इथेच थांबली नाही, तर गरिबीमुळे तिला शिक्षण घेता आले नाही याची खंत तिच्या मनात होती. पण आपल्या भावंडासाठी त्यांना उच्च शिक्षण मिळावे, म्हणून त्यांच्या पायावर उभे होण्याकरिता सुग्रतीने अतोनात प्रयत्न करून बहिणींना शिकवले. नऊ बहिणी असल्यामुळे व हलाखीची परिस्थिती असल्यामुळे काही बहिणींचे लग्न सुग्रतीने स्वबळावर केले. आणि धाकट्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या होण्यासाठी सहा शीलाई मशीन विकत घेऊन गावातील महिलांचे ड्रेस, ब्लाउज व शाळेचा गणवेश शिवायला सुरुवात केली व बहिणीचे सुद्धा आर्थिक स्तर उंचावला आज संपूर्ण सलोना गावातील व आजू – बाजूच्या सर्व गावातील महिला व मुली सुग्रतीकडे ड्रेस व ब्लाउज शिवण्यासाठी येतात.
इतकेच नव्हे तर उत्तम व निरोगी आरोग्या करिता परसबागेद्वारे घरी स्वतःचा भाजीपाला वांगी, टोमॅटो, पालक, मेथी, इत्यादी परस बागेमधून उत्पादन घेत आहेत. सुग्रतीचा आदर्श घेऊन महिला सुद्धा परसबाग लावण्यास तत्पर आहेत. विविध रोगांपासून बचाव करण्याकरिता प्रत्येक घरी शौचालय बांधण्याकारिता सुग्रतीने पुढाकार घेतला आहे. स्वत: उभे राहून आपल्या गावातील महिलांना स्वच्छतेची माहिती देत असते. महिलांच्या आरोग्यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करीत असते. स्वत: पुरती मर्यादित न राहता सर्व गावाचा व महिलांचा विकासाचा जणू विडा तिने उचलला आहे.
मेळघाटातील आदिवासी महिलांचा आधारच ठरलीय सुग्रती रामकिसन मेटकर आणि हे शक्य झाले आहे केवळ महिला आर्थिक विकास मंडळाच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *