Breaking News

शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा “नशीबवान विजय” अत्यंत कमी खर्चात मिळविले निवडणूकीत यश

हातकणंगलेः प्रतिनिधी
निवडणूका म्हटल्या की विजय मिळविण्यासाठी वारे-माप खर्च करणे आले. मग तो कधी कायदेशीर तर कधी बेकायदेशीर पध्दतीने खर्च करण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाचा उमेदवार मागे पुढे पहात नाही. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे विजयी झाले असून त्यांच्या या विजयाची चर्चा सबंध मतदारसंघात रंगू लागल्याने त्यांचा विजय हा नशीबवान विजय म्हणून गणला जात आहे.
धैर्यशील माने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदीता माने यांचे सुपुत्र असून लोकसभा निवडणूकीला उभे राहण्यापूर्वी ते काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेचे दोनवेळा सदस्य होते. विशेष म्हणजे या दोन्हीवेळी ते दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आले. मात्र प्रत्येकवेळी ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघाला विसरण्याचे कामही केले.
ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना सोडली होती. त्यामुळे शिवसेनेने धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली. वास्तविक पाहता राजू शेट्टीसारख्या मातब्बर शेतकरी नेत्याच्या विरोधात आपण निवडून येवू की नाही याची हमी माने यांनाही नव्हती. तरीही त्यांनी निवडणूकीच्या रिंगणात उडी मारली.
कधीकाळी राजू शेट्टी यांचे सहकारी असलेल्या आणि आता भाजपा आघाडीचे सदस्य असलेल्या सदाभाऊ खोत यांच्यावर प्रचाराची धुरा भाजपा आणि शिवसेनेने सोपविली. त्यामुळे खोत यांनीही जमेल त्या भागात प्रचारसभा घेत माने यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या.
या प्रचारसभा घेताना कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या माने यांच्याकडून एक छदामही कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना मिळत नव्हता. तरीही सर्वजण स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून माने यांच्या प्रचारासाठी झटत होते. मात्र शेट्टी यांच्या समोर ते निवडूण येणार नाहीत असा विश्वास सर्वांना होता. मात्र नागरीकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवित त्यांना लोकसभेत पाठवले.
विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी शिवसेनेकडूनही आर्थिक रसद पुरविण्यात आली नाही की त्यांनी स्वतःही फारसे काही केले नाही. तरीही त्यांच्या सबंध निवडणूकीचा खर्च हा अवघ्या १५ लाखातील असल्याची माहिती त्यांच्या प्रचारासाठी राबणाऱ्या एका नेत्याने दिली.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *