Breaking News

मेनलॅन्ड ते अँनाकापा पोहणारा मुंबईचा प्रभात ठरला पहिला आशियाई जलतरणपटू आशियाखंडातील पहिला महाविद्यालयीन विद्यार्थी

मुंबई: प्रतिनिधी
कॅलिफोर्नियातील सांताबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील २० किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा मुंबईकर प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. आतापर्यँत जगभरातील केवळ १४ जलतरणपटूनी अशी कामगिरी साधली आहे. चेंबूरच्या बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रभातने सातव्या क्रमांकाची वेळ नोंदवली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेकरता प्रशांत महासागरात सराव करत असताना प्रभातचा डावा खांदा दुखावला होता. पण या दुखण्यावर मात करत प्रभातने यशावर शिक्कमोर्तब केले.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३ जुलै रोजी प्रभातने अँनाकापा ते मेनलॅन्ड हे २० किलोमीटरचे अंतर पोहण्यास सुरुवात केली. पण या मार्गात असलेल्या तेलाच्या विहरीतील निघालेला तेलाचा तवंग पाण्यावर पसरला होता. सुमारे ८ किलोमीटरचे अंतर पोहून गेल्यावर पाण्यावर पसरलेल्या तेलाचा प्रभातला खूप त्रास झाला. पोहत असताना अवघ्या १५ मिनिटाच्या कालावधीत प्रभातला वारंवार उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी प्रभातने पाण्याबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या अपयशामुळे नाउमेद न होता १० जुलै रोजी प्रभात मेनलॅन्ड ते अँनाकापा हे उलट अंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि त्यात यशही मिळवले. यावेळी पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला लागल्याने प्रभातला अपेक्षित वेळ साधता आली नाही. साधरणतः; चार फुटाची लाट आणि १३ अंश सेल्सिअस पाण्याचे तापमान असताना प्रभातने २० किलोमीटरचे अंतर ६ तास २० मिनिटामध्ये पोहून पार केले.
या यशानंतर कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळवण्यासाठी आवश्यक असणारा लेक तहाउमध्ये पोहण्यासाठी प्रभात १७ जुलै रोजी पाण्यात उतरला. कॅलिफोर्नियातील सुमारे २००० मीटर उंचीवर आणि पाण्याचे तापमान ११ अंश सेल्सिअस असतानाही प्रभातने निर्धाराने ३५ किलोमीटरचे अंतर पोहण्यास सुरुवात केली. पण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केल्यावर प्रभातच्या खांद्याच्या दुखण्याने उचल खाल्ली. तरीसुद्धा प्रभातने नेटाने पोहणे चालूच ठेवले. पण शेवटच्या टप्प्यात वेदना असह्य झाल्याने दुखणे आणखी वाढू नये म्हणून प्रभातने यश समोर दिसत असतानाही माघार घेतली. या दुखण्यावर योग्य ते उपचार घेतल्यावर पुढील वर्षी प्रभात पुन्हा एकदा पोहण्यासाठी लेक तहाउमध्ये उतरणार आहे.
इंग्लंडच्या मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताबाच्या मानकरी असलेल्या सॅलीमेंटी ग्रॅव्हीट यांच्या मार्गदर्शानुसार सराव करणाऱ्या प्रभातने दीर्घ पल्ल्याच्या जलतरणात चांगलीच छाप पाडली आहे. खुल्या पाण्यातील जलतरणात तिहेरी यश संपादन करणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे.हवाई बेटावरील कैवी चॅनेल जलदरीत्या पोहणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे. दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागरही जलदरीत्या पोहण्याची कामगिरी प्रभातने साधली आहे. इंग्लंडमधील नॉर्थ आयर्लंड येथील नॉर्थ चॅनेल आणि जपानमधील त्सुगुरु चॅनेल पोहणारा प्रभात आशियातील युवा जलतरणपटू आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *