Breaking News

या कारणामुळे फडणवीस आणि मंत्री पाटील यांचा एकाच वाहनाने प्रवास काल नंदूरबार मधील कार्यक्रमासाठी दोघांनी केला होता एकत्र प्रवास

नंदूरबार-मुंबई: प्रतिनिधी

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी ठरतील असे सूचक वक्तव्य करत राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यातच लगेच दुसऱ्या दिवशी नंदूरबार मधील एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच वाहनाने प्रवास केल्याने एका वेगळ्याच चर्चेला ऊत आला. मात्र या दोघांना एका किरकोळ कारणामुळे एकत्र प्रवास करायला लागल्याची माहिती हाती आली आहे.

झाले असे की मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वेळापत्रक प्रचंड बिझी आहे. त्यातच त्यांना पक्षाच्या जबाबदारी बरोबरच खात्याची जबाबदारीही पार पाडावी लागत आहे. त्यामुळे पाटील यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक मिनिट, क्षणाचा वापर करत प्रत्येक काम हातावेगळे करण्याचा प्रयत्न करावे लागत आहे.

नंदूरबार येथील सीके अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच मंत्री जयंत पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे नंदूरबार येथील विमानतळावर काही वेळापूर्वी पोहोचले होते. त्यानंतर जयंत पाटील हेही विमानाने तेथे उतरले. त्यानंतर ते कार्यक्रमासाठी  जलसंपदा विभागाने पाठविलेल्या गाडीची चौकशी केली असता विभागाने त्यांना गाडीच उपलब्ध करून दिले नसल्याची माहिती मिळाली.

तेव्हा विमानतळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्याच वाहनाने एकत्रित प्रवास करण्यास निघाले. आता वाहनच उपलब्ध झाले नसल्याने अखेर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रवास केल्याने राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या कार्यालयाशी आणि फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जयंत पाटील यांचे वाहन विमानतळावर आले नसल्याने फडणवीस आणि पाटील यांनी एकाच वाहनाने प्रवास केल्याचे सांगण्यात आले. तसेच या दोघांची भेट विमानतळावरच झाल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्या एकत्रित प्रवासामागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले.

सध्या पुढे आलेले कारण हे वाहनाचे असले तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचेच झाले तर राजकारणात कधीही काहीही घडू शकते. मात्र ते कसे घडवायचे आणि कधी घडू द्यायचे हे आपल्या हातात असते.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *