Breaking News

भाजपा उमेदवाराचे नाव काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत आघाडीच्या शपथनाम्यात गोंदीयाच्या उमेदवाराचे नाव

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विद्यमान भाजपा-शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक लहान-मोठ्या पक्षांना घेवून आघाडीची स्थापना केली. मात्र या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या जाहिरनामा समितीत भाजपाचे गोंदीयातील उमेदवार गोपालदास अगरवाल यांचे नाव असल्याने आघाडीच्या जाहीरनाम्याच्या शपथनामाबाबत संशय निर्माण झाला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या आघाडीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लीकन पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी आदीजण सहभागी आहेत. या सर्व आघाडी पक्षांच्यावतीने संयुक्त जाहीरनामा अर्थात शपथनामा आज जाहीर करण्यात आला.
हा शपथनामा तयार करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील जाहीरनामा समिती तयार करण्यात आली. यामध्ये वसंत पुरके, सुरेश शेट्टी, राजेंद्र दर्डा, अमिन पटेल, शोभाताई बच्छाव आणि गोपालदास अगरवाल यांच्यासह जवळपास २३ जण आहेत.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे आमदार गोपालदास अगरवाल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तसेच भाजपाकडून अगरवाल यांना गोंदीयातून तातडीने उमेदवारीही जाहीर करण्यात आली. वास्तविक पाहता काँग्रेसकडून शपथनामा जाहीर करताना पुस्तकातील त्यांचे नाव वगळायला हवे होते. परंतु त्यांचे नाव तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे काँग्रेसकडूनच भाजपाला रसद पुरविली जातेय की काय असा संशय राजकिय वर्तुळात निर्माण झाला आहे.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *