Breaking News

वीजबिलातील सवलतींचा लाभ घ्या महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे ग्राहकांना आवाहन

महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनच्या सुविधेमुळे वीजबिलात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजबिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.

शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर केला तर दरमहा किमान वीस रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते. दोनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने या तीनही उपायांचा अवलंब केला तर दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची सवलत मिळते. महिना तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाला तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर करून दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते.

विजेची बिले ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीज ग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलातही सवलत मिळते. त्यासोबत महावितरणच्या वेबसाईटवरून अथवा ॲपवरून एकदा गो ग्रीनसाठी नोंदणी केली तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळत राहते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *