Breaking News

मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र केले हे आवाहन २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला

मराठी ई-बातम्या टीम

२७ फेब्रुवारी हा थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस असून हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्रान्वये राज्यातील मनसैनिकांना केले आहे.

लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा “गौरव” दिवस आहे हा. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण, ह्या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचीही भाषा मराठीच असल्याचे त्यांनी मनसैनिकांना सांगितले.

वाचा राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलेले पत्र त्यांच्याच भाषेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकहो,

सस्नेह जय महाराष्ट्र !

२७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करतो. “गौरव दिवस”. पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, आपल्या पक्षानी सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली.

हा आपल्या भाषेचा “गौरव” दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा.

आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा “गौरव” दिवस आहे हा. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण, ह्या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचीही भाषा मराठीच !

अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा.

ह्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज “मराठी भाषा गौरव दिवस” आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेव्हढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा.

संपूर्ण राज्यात ह्या दिवसाच्या निमित्तानं मराठीमय वातावरण करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा !

आपला नम्र,

राज ठाकरे

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *