Breaking News

महाराष्ट्रातील या ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान प्रथम क्रमांकाचे तीन तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी एक पुरस्कार

सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने १७ ते २१ एप्रिलपर्यंत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, विभागाचे सचिव सुनील कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी काही प्रमुख पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर, काही पुरस्कार केंद्रीय मंत्री सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध ९ श्रेणीतील सतत विकासाच्या मानकांनुसार द्रारिद्र्यमुक्त आणि सुधारित उपजिवीका श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील खंडोबाचीवाडी आणि स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणून कुंडल या ग्रामपंचायतींना राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह दोन्ही ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात प्रत्येकी एक कोटी रूपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली. खंडोबाचीवाडीचे सरपंच धंनजय गायकवाड, उपसरपंच उत्तम जाधव, ग्रामसेवक स्वप्नगंधा बाबर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या छोट्याशा गावाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी २८ बचत गटांची निर्मित केली. या माध्यमातून गावातील महिलांना २८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. या रक्कमेतून महिलांनी कापड दुकान, शिलाई व्यवसाय, किराणा व्यवसाय, मिरची कांडप, ब्युटी पार्लर, कुक्कुटपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय, शेळीपालन असे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत गावातील ३४९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत गावातील २२ दिव्यांग व महिलांना संजय गांधी निराधार निवृत्तीवेतन योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेचा ३६७ लाभार्थींना लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ४०३ लाभार्थींचे खाती उघडण्यात आली असून विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिल्याबद्दल ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी देशात अव्वल ठरली आहे.

स्वच्छ आणि हरित पंचायत या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कुंडल ग्राम पंचायतीला गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच दगडू खाडे, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, ग्रामसेवक महादेव यल्लाटे यांनी स्वीकारला. गावामध्ये ५ लाख लीटर प्रतिदिन क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लॅन्ट) आहे. ३५ सौर पथदिवे (सोलर स्ट्रिटलाईट) आहेत व सर्व रस्त्यांवर आणि संपुर्ण गावातील घरांमध्ये एलईडी बल्ब आहेत. गाव संपुर्ण हगणदारी मुक्त आहे. पर्यावरणपूरक घनकचरा व सांडपाणी प्रकल्प गावामध्ये उभारण्यात आला आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या २०० कचरापेटीद्वारे गोळा केला जातो. गावात १५०० एकर जैविक पद्धतीने शेती करण्यात येते. त्यांच्या या कार्याची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतीला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच संतोष टिकेकर, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामसेवक अस्लम हूसेन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या ग्राम पंचायतीने सोलर पॅनल, पवनचक्की, बॉयोगॅसच्या माध्यमातून १५ हजार वॅट विद्युत निर्मित केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी आज ग्रामपंचायतीचा गौरव झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल विशेष पंचायतीचा व्द‍ितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्र, ग्रामसेवक पुंडलिक पाटील यांनी स्वीकारला. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी या ग्रामपंचायतीने नावीण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या गावाने रस्त्यांच्या दोन्ही कडेला फळ भाज्यांची झाडे लावली आहेत. प्रदूषण मुक्त गाव होण्याचा मान या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. व्यासपीठावरून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री श्री. पाटील यांनी या गावाच्या कामाचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील आलाबाद या ग्रामपंचायतीला महिला अनुकूल पंचायत या श्रेणीतील तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच लता कांबळे, ग्रामसेवक अनिकेष पाटील यांनी स्वीकारला. आलाबादची लोकसंख्या १८८३ असून महिलांची संख्या ८४८ असून ती ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायत आलाबादने महिला सक्षमीकरण आणि बाल विकासावर काम केले. शाळाबाह्य मुली, कमी वजनाच्या मुली आणि अशक्त मुली आणि महिला यावर ग्रामपंचायतने विशेष भर दिला. महिला सभेच्यावेळी ग्रामपंचायत महिलांना एकत्र करण्यासाठी छोट्या कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण मोहिमेसाठी किंवा आरोग्य तपासणीसाठी महिलांना एकत्र करणे अवघड होते. अशावेळी आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने महिलांना त्यांच्या घरी लसीकरण करून त्यांना योग्य उपचार दिले जाते. किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण दिले जाते आणि त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने प्राथमिक शाळा आणि विद्यालयामध्ये जनजागृती केली जाते.

ग्रामपंचायत आलाबाद, गावाला महिला स्नेही ग्रामपंचायत बनवणे. यासाठी महिला आणि मुलींच्या प्रत्येक कामाची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने समित्या स्थापन केल्या आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि प्रेरिका ताई नोंदी घेत असतात आणि गरोदर/स्तनपान करणाऱ्या, मुली आणि सर्व महिलांच्या समस्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर आज आलाबाद ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *