Breaking News

अखेर १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईनच: मात्र विद्यार्थ्यांना या गोष्टींची सवलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती

मराठी ई-बातम्या टीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑनलाईन घ्या, रद्द करा या मागण्यांवरून दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईसह, उस्मानाबाद, नागपूर सह अनेक जिल्ह्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून परिक्षा पुढे ढकलणार का? ऑनलाईन घेणार का? याबाबत उत्सकुता निर्माण झाली होती. मात्र परिक्षा नियोजित वेळेत आणि ऑफलाईन पध्दतीनेच घेणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

त्याचबरोबर कोविड काळात विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव मोडलेला असल्याने लेखी पेपरसाठी अर्ध्या तासाचा वाढीव वेळ देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी फक्त ७५ टक्केच अभ्यासक्रम निर्धारीत केला असून २५ टक्के अभ्यासक्रम यंदाही वगळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होणार असल्याचे सांगत अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्याने ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचे महाविद्यालय केंद्र राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दहावी परिक्षेसाठी १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून बारावी परिक्षेसाठी १४ लाख ७२ हजार ५६५ अर्ज प्राप्त झाली आहेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असून इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नसल्याचे स्पष्ट करत गोवा, गुजरात, कर्नाटक राज्यातील परिक्षा मंडळाकडून त्याचे धोरण काय याची पाहणी केली. परंतु या राज्यांनीही ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन परिक्षा पध्दतीची निवड केली असल्याने आपणही ऑफलाईन परिक्षा घेत असून इतक्या मोठ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा घेणं शक्य नसल्याचे स्पष्ट करत परिक्षेसाठी कोरोना लस घेणं बंधनकारक नसल्याचेही त्यांनी सांगितले.

परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. यामुळे त्यांनी परीक्षा देताना परिचित वातावरण मिळेल आणि कमी प्रवास करावा लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. शाळा तिथं परीक्षा केंद्र असून बहिस्थ नाही तर शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर असतील.

परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. करोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. तसेच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फेत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या दोन्ही परिक्षांसाठी प्रत्येक वर्गात किमान २५ विद्यार्थी एका वर्गात बसविण्यात येणार असून नियमित परिक्षा केंद्रापेक्षा चार पट अधिक परिक्षा केंद्रे निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *