Breaking News

एक लक्ष झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी

स्वत:च्या मालकीचा जमिनीचा हक्क मिळणे ही जीवनात अत्यंत महत्वाची बाब आहे. अनेक वर्षांपासून ज्या जागेवर झोपडपट्टीधारक वास्तव्य करीत आहेत, त्यांना मालकी हक्काचे पट्टे  देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शहरातील झोपडपट्टीधारकांना एक लक्ष मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

जरीपटका येथील संत लहानुजी नगर मधील नागपूर सुधार प्रन्यासच्या मैदानावर  झोपडपट्टीवासीयांना नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील कस्तुरबा नगर व इंदिरा नगर येथील मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते.

अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलींद माने, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ. दिपक म्हैसेकर, विश्वस्त भुषण शिंगणे, स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, महाव्यवस्थापक अजय रामटेके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामान्य माणसाचा सर्वात मोठा अधिकार म्हणजे त्याच्या मालकीची जमीन असणे. ज्यांच्याकडे जमीनीचा तुकडाही नाही तो अस्तित्वहीन समजला जातो. उत्तर नागपूर मधील झोपडपट्टीधारक मालकी हक्काच्या पट्टयापासून वंचित राहीले होते.  आज त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून देतांना अत्यंत आनंद होत असल्याचे यावेळी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाने सामान्य नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा हा मुलभूत अधिकार मिळवून दिला आहे. त्यांचा हा हक्क कुणीही हिरावू शकत नाही. नागपूर सुधार प्रन्यासच्या जमिनीवर ५२ झोपडपट्टया आहे. त्यातील ४० झोपडपट्टयांमधील पट्टे वाटप येत्या तीन महिन्यात करण्यात येईल. उर्वरित दहा झोपडपट्टयांना मालकी हक्काच्या पट्टे वाटपाची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे, हीच कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावर संपूर्ण शहरात लागू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, वर्षानुवर्षे शासकीय तसेच नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर राहत असलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी निर्णय घेवून शहरातील नागरिकांना त्यांच्या जागेचा मालकी हक्क मिळवून दिला आहे. गरीब व सामान्य माणसाच्या हिताचे संरक्षण करण्याला प्राधान्य असून त्यांच्या विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

यावेळी सिंधी बांधवांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. ७० वर्षापासून येथे आलेल्या सिंधी बांधवांना ते राहत आहे, त्या जागेवर मालकी हक्क देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी म्हणाले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *