नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी
आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून उडालेला राजकिय धुराळा खाली बसविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत अनिल देशमुख हे ३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कोविड-१९ या विषाणूमुळे रूग्णालयात दाखल होते आणि त्यानंतर ते गृह विलगीकरणात असल्याचे सांगत क्लीनचीट दिली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचे ते ट्विट रिट्विट केल्याने पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांगलीच अडचण झाली.
परमबीर यांनी आरोप केल्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सचिन वाझे गृहमंत्री देशमुख यांना भेटले. तसेच त्यानंतर इतर दोन अधिकारी भेटल्याचा दावा केला होता. परंतु ३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख यांना कोविड-१९ या विषाणूची लागण झाल्याने रूग्णालयात दाखल होते. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यत गृह विलगीकरणात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच यासंदर्भातील सर्व कागदपत्रेही त्यांनी यावेळी दाखविले.
या उपलब्ध कागदपत्रांमुळे परमबीर सिंग यांच्या दाव्यातील फोलपणा दिसून येत असल्याचे सांगत अनिल देशमुख यांच्या चौकशीची आवश्यकता आणि त्यांच्या राजीनाम्याची गरज राहीली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच या संपूर्ण प्रकरणातील मुळ विषय हा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेली गाडी ठेवण्याचा विषय आहे. त्यामुळे हा विषय डायव्हर्ट करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना केले.
यावेळी काही पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट दाखवित अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतल्याच्या माहितीबाबत शरद पवारांना विचारणा केली.
त्यावर पवार यांनी माझ्याकडे जी कागदपत्रे आहेत त्या अनुषंगाने आपण बोलत आहोत. विरोधक म्हणून त्यांनी काय आरोप करावेत तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत आपण बोलणार नसून आरोप करण्याचा अधिकार त्यांचा असून ते त्यांचे काम करत असल्याचेही ते म्हणाले.
मात्र १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अनिल देशमुख यांनी ट्विट करत त्या दिवशी पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर केला होता. आता तोच व्हिडिओ त्यांच्या राजकिय कारकिर्दीत अडचणीचा ठरण्याची शक्यता निर्माण होत आहे. दरम्यान फडणवीसांच्या त्या ट्विटमुळे शरद पवार आणि अनिल देशमुख यांची चांगलीच अडचण झाल्याचे सध्याच्या राजकिय परिस्थितीवरून दिसून येत आहे.
15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात.
पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती.
हे नेमके कोण? https://t.co/r09U8MZW2m— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021