Breaking News

राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काढले यांनी काढत डिसले यांच्यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award)  मिळालेल्या रणजितसिंह डिसले (Ranjeetsingh Disale) यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb THorat), शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Ekanath Shinde), परिवहन मंत्री ॲड. अनिल परब (Anil Parab), पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसुन त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येय्यवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते. कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपुर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.

जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांचे उत्तम काम- उपमुख्यमंत्री

सोलापूरसारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने हा पुरस्कार मिळविला ही खरच अभिनंदनीय बाब आहे. या शाळांमधील काम उत्तम आहे याचा दाखला या पुरस्काराच्या रुपाने मिळाला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणाले, तंत्रज्ञानातील नाविन्यपुर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगातील सर्वोत्तम  शिक्षकांच्या क्रमवारीत ते आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तयार केलेली क्यु आर कोडेड पुस्तके राज्यातील एक कोटीहून अधिक मुले वापरत असून जगभरातील  देशातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी सुरु आहे.

विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी आणि ज्ञानवर्धक शिक्षण कसे देता येईल यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या ज्ञानाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले.

इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

जिल्हा परिषदेच्या शाळांमधून जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जात असून आता इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाऱ्या शाळा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ओळखल्या जात आहेत. यासाठी रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ते म्हणाले, जिल्हाधिकारी झालेले अनेकजण जि.प शाळेचे विद्यार्थी होते. वेगळी वाट निवडून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डिसले यांच्यासारख्या शिक्षकांमुळे इंटरनॅशनल म्हणवणा-या शाळांतील मुलेही एक दिवस परत जि. प शाळेत शिकायला येतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डिसले यांच्यासारख्या शिक्षकांचा राज्याला अभिमान–  शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

डिसले सरांनी शैक्षणिक क्षैत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हे तर साऱ्या जगभर पोहचविणाऱ्या रणजितसिंह डिसले सरांच्या कार्याचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी  काढले.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून जास्तीत जास्त तंत्रस्नेही व सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार अशी भावना सत्कार समारंभाला उत्तर देताना रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केली.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला.  सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार  प्राप्त झाला. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले सरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *