Breaking News

आम्ही गोव्याचा विकास केला, पण गांधी परिवारासाठी फक्त सुट्टीचं ठिकाण निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम

देशातील पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष प्रचार आणि जाहिर सभांना केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातलेली असली तरी ऑनलाईन प्रचार सभांचा धडाका भाजपाने सुरु केला आहे. या प्रचारसभेचा भाग म्हणून गोव्यातील पोंडा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा ऑनलाईन पार पडली. त्यावेळी त्यांनी गोव्याचा विकास भाजपा सरकारने केल्याचे सांगत गोवा म्हणजे गांधी घराण्यासाठी फक्त सुट्टीचे ठिकाण असल्याची खोचक टीका केली.

गोव्यामध्येही निवडणुकीची धामधूम दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः भाजपाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज गोव्यात केलेल्या एका वक्तव्याने लक्ष वेधून घेतलं आहे.

गोव्यात पोंडा शहरात झालेल्या एका सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, भाजपाने गोव्याचा विकास केला. गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे. भाजपासाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा. पण काँग्रेससाठी गोवा म्हणजे गांधी परिवाराचा गोवा. पूर्वी केंद्र सरकारकडून फक्त ४३२ कोटी मिळत होते. परंतु आता आम्ही ही रक्कम वाढवून २ हजार ५६७ कोटी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या विकासासाठी काहीही केलं नाही. भाजपाने मात्र दिलेला शब्द पाळला. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचे कौतुकही केले. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत, मनोहर पर्रिकरांच्या गोल्डन गोव्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप कष्ट घेत असल्याची कौतुकाची थापही त्यांनी यावेळी प्रमोद सावंत यांना दिली.

गोव्यातला लसीकरणाचा वेग देशात सर्वाधिक आहे. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेगाने १०० टक्के लसीकरणाचं लक्ष गाठण्यात गोवा यशस्वी ठरला आहे. गोव्यामध्ये २०२५ पूर्वी अनेक स्टार्टअप्स असतील. तसेच गोव्यात भाजपा ३००० कोटींचे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

गोव्यात काँग्रेसने स्वबळाचा नारा देत एकट्याने रिंगणात उतरली आहे. तर पहिल्यांदाच राज्यातील तृणमूल काँग्रेस आणि आपकडूनही या निवडणूकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे आगामी गोवा विधानसभेत कोण किती जागा मिळविणार हे मार्च महिन्यात समजणार असले तरी आगामी काही दिवसात राजकिय रणधुमाळी चांगलीच रंगणार असल्याचे सध्या दिसून येत आहे. गोवा राज्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *