Breaking News

भास्कर जाधवांनी काँग्रेसचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, नीट लक्षात ठेवा, ५० वर्षे विरोधी पक्षात… सूडाने सत्ता राबवू नका, विरोधकांची विकासकामे रोखू नका

विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेर सध्या उध्दव ठाकरे यांच्या गटात जे काही अभ्यासू वक्ते राहिले आहेत. त्यामध्ये कोकणातील आमदार भास्कर जाधव यांचे नाव आवर्जून घेण्यात येते. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करत कायदेशीर संस्थांचा कसा वापर करण्यात येतो हे सोदाहरण विधानसभेत भास्कर जाधव यांनी सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला इशारा देत म्हणाले, काँग्रेस नेते सत्तेचा पाळणा घेऊनच जन्माला आले होते, मात्र भाजपाचे तसे नाही, भाजपाची तब्बल ५० वर्षे विरोधी पक्षातच गेली आहेत हे नीट लक्षात ठेवा, विरोधकांशी सूडाने वागू नका, विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामे हेतुपरस्पर रोखू नका अशा शब्दात खडसावले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर बोलतांना भास्कर जाधव यांनी आक्रमक शैलीत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले.

भास्कर जाधव पुढे म्हणाले की, काही २०१४ नंतरचा काळ सोडला तर भाजपाची तब्बल ५० हून अधिक वर्षे विरोधी पक्षात गेली. संसदेत कधी काळी २ खासदार असलेला हाच भाजपा पक्ष आहे. शिवसेनेमुळे माझाही काळ मोठ्या-प्रमाणावर विरोधी पक्षातच गेला. मात्र यापूर्वी कधीही इतक्या सूडाने विरोधी पक्षातील आमदारांशी वागण्यात आले नव्हते. उलट ज्या काँग्रेसची देशात, राज्यात सत्ता होती त्या काँग्रेसचे मंत्रीही विरोधी पक्षाचा आमदार भेटायला गेला तर स्वतः आवर्जून स्वतःच्या जागेवरुन उठून उभे रहायचे आणि विरोधकांची कामे करुन द्यायचे अशी आठवणही यावेळी करून दिली.

यावेळी पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, आता राज्यात सत्तेत असलेली मंडळी जाणूनबुजून सूडाने वागत आहेत. माझ्या मतदारसंघातील आमच्या सरकारने मंजूर केलेल्या विकास कामानांही स्थगिती दिली गेली. मतदारसंघातील विकासकामांबाबत मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या साऱ्यांपर्यंत कामांच्या फाईल्स घेऊन फिरलो. मात्र तरीही स्वतःला जनतेचे मुख्यमंत्री म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विकासकामांवरील स्थगिती उठवली नाही. इतकेच नव्हे तर येत्या एक महिन्यात भास्कर जाधवला तुरुंगात कसे टाकता येईल यासाठी संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत असा गौप्यस्फोट ही केला.

आमदार राजन साळवी, वैभव नाईक यांच्यांसह आमच्या अनेक आमदारांच्या चौकशा सुरु आहेत. पण या सरकारला आणि फडणवीस यांना माझे एकच सांगणे आहे. आम्ही तुम्हाला देशाचे भावी पंतप्रधान म्हणून मोठ्या आशेने पाहतो. मात्र इतक्या सूडाने विरोधकांशी वागू नका. तुम्ही कितीही चौकशा मागे लावा, जेल मध्ये टाका, मतदारसंघातील विकामकामे रोखा काहीही करा, मात्र मी गुडघे टेकणार नाही हे लक्षात ठेवा असेही भास्कर जाधव यांनी ठणकावून सांगितले.

Check Also

ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलत त्यांच्या मुलाला दिली उमेदवारी

महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केलेले कैसरगंजचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *