Breaking News

आता पुण्यातही होणार भुयारी मेट्रो राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले असून पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या ५.४६४ कि.मी. लांबी, ३ स्थानके असलेल्या रु. ३६६८.०४ कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.
पुणे मेट्रोसंदर्भात आज राज्यमंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय पुढीलप्रमाणे :-
1. सदर प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात रु. ४५०.९५ कोटी व केंद्र व राज्य शासनाचे कर/शुल्क यांवरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात रु. ४४०.३२ कोटी असा एकूण रु. ८९१.२७ कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.
2. सदर प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून रु. ४५०.९५ कोटीचे अनुदान आणि भूसंपादन, पूनर्वसन व पूनर्वसाहत व बांधकाम कालावधी दरम्यानचे व्याज याकरिता रु. २०४.१४ कोटी असे एकूण रु. ६५५.०९ कोटी इतके वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
3. सदर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून रु. ३००.६३ कोटी इतके अनुदान प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे.
4. सदर प्रकल्पाकरिता द्विपक्षीय/बहुपक्षीय वित्तीय संस्थेमार्फत रु. १८०३.७९ कोटीचे अल्प व्याज दराचे कर्ज घेण्यास, सदर कर्जाची मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांचा कोणताही भार राज्यशासनावर येणार नाही या अटीवर, महामेट्रो यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली.
5. सदर प्रकल्प माहे एप्रिल, २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
6. पुणे शहरातील स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वांरवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होऊन सदर परिसरातील नागरीकांना तसेच एकंदरीच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही भूयारी मेट्रो रेल मार्गिका निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *