Breaking News

फडणवीस सरकारपाठोपाठ आता ठाकरे सरकारकडून पुन्हा तिरूपतीला भूखंड नवी मुंबईतील उलवे येथील १० एकरचा भूखंड देवस्थानला

आंध्र प्रदेशातील प्रसिध्द अशा तिरूमला तिरूपती देवस्थानला अखेर १० एकर जमिन देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाची मोहोर उमटली आहे. विशेष म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात बीकेसी सारख्या महागड्या भागात भूखंड दिल्यानंतर आता ठाकरे सरकारने पुन्हा एकदा तिरूपती देवस्थानला १० एकरचा भूखंड दिला आहे.
विशेष म्हणजे तिरूपती देवस्थानच्या विश्वस्त पदावर शिवसेनेचे सचिव तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती होवून जेमतेम सात साडेसात महिने झाले असतानाच नवी मुंबईतील १० एकर जागा देवस्थानच्या मंदिरासाठी नार्वेकर यांनी मिळवून दिली. उलवे येथील जमिन देण्याबाबतचा निर्णय सिडको प्राधिकरणाने घेतला. त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडण्यात आला. त्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूरी देण्यात आली.
त्यामुळे या जागेवर आता तिरूपती बालाजीचे भव्य मंदीर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भाविकांना दक्षिणेऐवजी आता नवी मुंबईतच बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे देवस्थान समितीवरील विश्वस्त पदाचा मान यंदा नार्वेकरांना मिळाला आहे. या पदासाठी सप्टेंबर महिन्यात नार्वेकरांची निवड झाली. त्यानंतर लगेचच मुंबईतच देवस्थानासाठी मुंबईत जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. त्यापाठोपाठ नार्वेकर यांनी समितीचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील उलवे येथील जागेची पाहणी घेतली आणि मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली.
त्यानुसार गेल्या महिन्यात सिडकोतर्फे संचालक मंडळाच्या बैठकीत देवस्थानला जागा देण्याचा निर्णय घेत त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याची सूचना मंत्री शिंदे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. हा प्रस्ताव रखडणार नाही याकडे विशेष लक्ष देऊन आदित्य ठाकरे तो प्रस्ताव मंजूर करून घेतला. दरम्यान पुढील वर्षभरात टप्याटप्प्याने या जागेचा ताबा देवस्थान समितीला मिळणार आहे.
मागील फडणवीस सरकारच्या काळात याच देवस्थानला बीकेसीतील ऐन कोट्यावधी रूपयांचा भूखंड हवा होता. त्यावेळी तत्काली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी ला देवस्थान समितीच्या विश्वस्त समितीवर स्थान देण्यात आले. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यासाठी या जमिनीसाठी नाममात्र एक रूपये इतके भाडे आकारण्यात आले. पूर्वी या जागेवर तिरूपती बालाजीचे मंदिर आणि तिरूपती येथील मंदिरासाठी ऑनलाईन रिजर्व्हेशन सुविधा करून देण्यात येणार होती.
मात्र आता बीकेसीतील जागेवर फक्त तिरूपती तिरूमला येथे जाणाऱ्या भाविकांचे आरक्षण होणार आहे. तर त्या मंदिराचे प्रतिकृती नवी मुंबई येथे देण्यात येणाऱ्या १० एकर जागेवर उभारण्यात येणार आहे.

Check Also

अमोल मिटकरी आणि शहाजीबापू पाटील यांच्यात कलगीतूरा, बारकी पोरंही… टोला प्रति टोल्याने दोघांतील वादांत वाढतेय रंगत

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.