Breaking News

राज्यपाल आणि तपास यंत्रणांच्या विरोधात देशभरातील नऊ पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर होतोय

भाजपाची सत्ता नसलेल्या आणि भाजपाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच वर्षभरापासून तपास करून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. त्यासाठी सुरुवातीला आयकर खात्याकडून नंतर ईडी मार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप या पत्राद्वारे केला आहे. तसेच देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्या नऊ विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (आप), तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (बीआरएस), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (तृणमूल कांगेस), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (आप), तेजस्वी यादव (राजद), फारूक अब्दुल्ला (जेकेएनसी), शरद पवार (एनसीपी), उद्धव ठाकरे (शिवसेना, यूबीटी) आणि अखिलेश यादव (सपा) यांचा समावेश आहे.

२०१४ मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर देशात विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाईचं प्रमाण वाढलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर मोठ्या प्रमाणात खोटे आरोप करण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्या राजकीय नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये नेते आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, सुवेंदी अधिकारी, मुकूल रॉय, नारायण राणे यांचा समावेश आहे, असा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे.

प्रदीर्घ चौकशीनंतर २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली. त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. कोणतेही पुरावे नसताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांची अटक एक राजकीय अटक होती. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचं हे उत्तम उदाहरण आहे, अशा कारवाईंमुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे.
राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यांमध्ये तेढ वाढत असल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आला आहे. तसेच याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *