Breaking News

अजित पवारांचा आरोप, प्रत्येक आमदाराला मंत्री करतो म्हणून सांगितलं होतं पण… आमचं सरकार असताना सरसकट निधी वाढविला

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होताच महाविकास आघाडीतील कामांना सरकारने स्थगिती दिली. आमदारांनी सोबत यावे म्हणून आमदारांना मंत्रिपदाच आश्वासन दिले. त्यामुळे दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नसल्याची खोचक टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर करत हा कोणता न्याय आहे, असा सवालही उपस्थित केला.

अहमदनगरमधील पाथर्डीत बोलताना अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झाल्यावर आमदारांचा निधी पहिल्या वर्षी तीन कोटी, दुसऱ्या वर्षी चार कोटी आणि मागील वर्षी पाच कोटी केला. भाजपाच्याही आमदाराला ५ कोटी, कर्जत-जामखेडचा आमदार आणि श्रीगोंद्याच्याही आमदाराला ५ कोटी रुपये मिळाले. जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी डीपीडीसीचे पैसे कमी न करता जास्तीचा निधी दिला.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, पण, ह्यांच सरकार आल्यावर आमच्या काळातील कामांना स्थगिती दिली. तिथे माणसं राहत नाहीत का? आमचेही कामं करा, तुम्हीही नवीन कामं करा. जास्तीची कामं झालं म्हणून काय होतं. परंतु, हा कसला रडीचा डाव खेळता. पाच-पाच लाख लोकसंख्येच प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांची कामं तुम्ही थांबवता हा कोणता न्याय आहे. सरकार बदलत असतात. ताम्रपट घेऊन जन्माला कोणी आलं नाही. आताचे बसलेले सुद्धा नाही. जनतेच्या मनात येईल तेव्हा बदल करते, असा इशारा अजित पवारांनी सरकारला दिला.

मंत्रिमंडळ विस्तारावरूनही अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हणाले, प्रत्येक आमदाराला सांगितलं होतं, तुला मंत्री करतो, तुला करतो. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तार केला, तर बाकीची आमदार माघारी जातील आणि सरकार पडेल ही भीती आहे. म्हणून विस्तार केला जात नाही. मात्र, याने महाराष्ट्राचं नुकसान होत असल्याची टीकाही केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *